झरे जिल्हा मध्यवर्ती बँक लॉकरफोड प्रकरण उघडकीस ; ३.२५ कोटींचा मुद्देमाल जप्त

Admin
झरे जिल्हा मध्यवर्ती बँक लॉकरफोड प्रकरण उघडकीस
३.२५ कोटींचा मुद्देमाल जप्त

सांगली : हॅलो प्रभात
झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गॅस कटरने लॉकर फोडून करण्यात आलेल्या मोठ्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणत तब्बल ३ कोटी २५ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे. ७ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या मागील खिडकीची काच फोडून गज गॅस कटरने कापले. लॉकर रूममधील २२ लॉकर फोडून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश व दिल्लीपर्यंत तपासाचा माग काढण्यात आला. एका आरोपीला उत्तर प्रदेशातील बदायूँ येथे अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीतील दागिन्यांची लगड हस्तगत करण्यात आली.
दरम्यान, दुसऱ्या पथकाने सांगलीवाडी परिसरात सापळा रचून स्कॉरपिओ वाहनातून चोरीचा माल विक्रीसाठी येत असलेल्या विश्वजीत पाटील (बांबवडे), संकेत जाधव (बलवडी) व इजाज आत्तार (आमनापूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, गॅस सिलिंडर व ऑक्सिजन सिलिंडर जप्त करण्यात आले. तपासात आरोपींनी उत्तर प्रदेशातील राहुल शर्मा व इतर साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली आहे. जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील मोठ्या बँक चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags
To Top