जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, युवक केंद्रस्थानी
सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
जिल्ह्याच्या विकासासाठी विमानतळ, आयटी पार्क, औद्योगिक वसाहतींची निर्मिती व विस्तार, सिंचन योजनांचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे,’ असा संकल्प स्पष्ट करणारा जाहीरनामा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जाहीर केला. शेतकरी, महिला आणि युवकांना केंद्रस्थानी ठेवणारे ३७ मुद्दे त्यात मांडण्यात आले आहेत. संसदेत जाऊन विशाल हे करून दाखवणार, अशी ‘गॅरंटी’ त्यातून दिली आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांचे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत काम करणे. शेतमाल प्रक्रिया उद्योग उभे करणे, शेतमाल निर्यातीसाठी कार्गो विमानतळाची उभारणी, कागदावरील राहिलेल्या ड्रायपोर्टची उभारणी, उद्योजकांना बळ देऊन उद्योगविस्ताराला चालना, हे महत्त्वाचे विकासाचे मुद्दे त्यांनी मांडले आहेत. शेतमाल साठवणूक व्यवस्था, हळद, ऊस, द्राक्ष व डाळिंब संशोधन केंद्र उभारणी, द्राक्ष व बेदाणा क्लस्टरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची उपलब्धता, रांजणीत शेळी-मेंढी पैदास व संगोपन केंद्र उभारणी हे शेतकऱ्यांशी निगडित मुद्दे त्यांनी मांडले आहेत. परदेशी शिक्षणासाठी विनातारण कर्ज, आयटी पार्क उभारणीतून आपल्या शहरात रोजगारनिर्मिती, जागतिक दर्जाचे कौशल्य विद्यापीठ उभारणे, शिक्षण व नोकरीनिमित्त शहरात राहणाऱ्या युवक-युवतींसाठी शासकीय वसतिगृह उभारणी; क्रीडांगण विकासातून खेळाला चालना असे तरुणाईशी निगडित मुद्दे त्यांनी चर्चेत आणले आहेत.
सांगली शहरातील व्यापाराला बळकटी व सुरक्षा पुरवणे, मिरज संगीत नगरी व वैद्यकीय नगरी म्हणून पर्यटन वाढवणे, गलई बांधवांचे प्रश्न सोडवणे, राष्ट्रीय ज्वेलरी संशोधन व स्कील डेव्हलपमेंट विद्यापीठ उभारणे, छोटे व्यावसायिक, हातगाडीवाले, रिक्षाचालकांसाठी अर्थसहाय्य योजना राबवणे, जिल्ह्यात मोठे उद्योग प्रकल्प उभारून रोजगाराच्या संधी निर्माण करणे, बाजार समितीचे धोरण बदलून शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलाईदार यांच्या विकासाला प्राधान्य देणे, असे मुद्दे त्यांनी वचननाम्यात मांडले आहेत. महापूर आणि दुष्काळी प्रश्नावर कायमच्या उपाययोजनांसाठी संसदेत आवाज उठवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना पूर्णपणे सौर ऊर्जेवर आणून वीज बिलांवरील ताण कमी करण्याचा त्यांचा संकल्प आहे. दिव्यांगांसाठीही विविध योजना राबवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर बचत गटांचे नेटवर्क उभारून महिला सक्षमीकरणाचा संकल्प त्यांनी मांडला आहे.