इचलकरंजी : डिजिटल हॅलो प्रभात
महापालिकेना मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी आरोग्य विभागाची बैठक घेतली आणि सारण गटारी, ओढ्यातील कचरा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र या बैठकीतील निर्णय कागदावरच राहिल्याचं सद्यस्थितीत दिसून येतय. काळा ओढा आणि सारण गटारीत मोठ्याप्रमाणात कचरा साचलाय. आमराई मार्गावरील काळ्या ओढ्यालगतच ड्रेनेज पाईपलाईनासाठी खोदकाम करून काढलेली माती आणि मुरुम ओढ्यातच टाकला जात असल्यानं ओढ्याच्या अस्तितत्वाचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं महापालिका प्रशासनानं याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन शहरातील काळ्या ओढ्याची आणि सारण गटारीची तातडीनं स्वच्छता करावी, ओढ्यात माती टाकल्यानं भविष्यातील धोके लक्षात घेऊन ओढ्याचं पात्र कमी होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी होत आहे. इचलकरंजी शहराची साडेतीन लाखाहून अधिक लोकसंख्या असून मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग आणि त्यावर अवलंबून असणारे उद्योग, व्यवसायही आहेत. या शहरातील सांडपाणी सुमारे 8 किलोमिटरच्या काळ्या ओढ्यातून विना प्रक्रिया पंचगंगा नदीला जाऊन मिसळतं.
अनेकवेळा मलनिसारण केंद्रातील पाणीही विना प्रक्रिया ओढ्यातून नदीला मिसळत असल्यानं नदी प्रदुषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अलिकडं तर या ओढ्याच संपूर्ण पात्रच प्लास्टिक कचर्यानं व्यापलं आहे. ओढ्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्यानं अस्वच्छतेचं साम्राज्य दिसून येतय. आतातर गेल्या महिन्याभरापासून आमराई रोडवरील या ओढ्यालगत ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदकाम केलेली माती, मुरुम ओढ्याच्या पात्रातच टाकलं जातं आहे. त्यामुळं ओढ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय.
शहरातील अनेक ठिकाणच्या सारण गटारीही प्लास्टिक कचर्यानं तुंबल्याचं दिसून येतंय. यामुळं डास आणि दुर्गंधीचा प्रार्दुभाव वाढलाय. पावसाळ्यापूर्वीची कामं पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं बैठक घेऊन ओढा, सारण गटारी स्वच्छतेचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात काम सुरू नसल्याचं दिसून येतंय. वळवाच्या पावसानंच अनेक ठिकाणी गटारी तुंबुन रस्त्यांना तळ्याचं स्वरुप येत आहे. वेळेत ओढे, सारण गटारी स्वच्छ न केल्यास प्रत्यक्षात पावसाळा सुरु झाल्यावर गटारी, सारण गटारी तुंबून नागरीकांच्या घरात सांडपाणी शिरण्याचं नाकारता येतं नाही. त्यामुळं काळा ओढा आणि सारण गटारीतील प्लास्टिक कचरा काढून स्वच्छता करावी, आमराई मार्गावरील ओढ्यालगत सुरू असलेल्या खोदकामाची माती, मुरुम ओढ्यात टाकल्यानं भविष्यात निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन माती, मुरुमा इतर ठिकाणी टाकण्याची मागणी होत आहे.