रिक्षा चालकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशिल : प्रकाश आवाडे

Admin
रिक्षा चालकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी 
प्रयत्नशिल : प्रकाश आवाडे
इचलकरंजी : डिजिटल हॅलो प्रभात 
         रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र संदर्भातील केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळण्यासह तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी मुदत मिळणे आणि अन्य मागण्यासंदर्भात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता संपताच परिवहन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. दरम्यान, या प्रश्‍नी रविवारी रात्री 12 ते सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत शहरातील सर्व रिक्षा बंद ठेवणार असल्याचे निवेदन शिष्टमंडळाने प्रांताधिकार्‍यांना दिले आहे.
        रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र विलंबासाठी रिक्षाचालकांना दररोज 50 रुपये दंड आकारला जात आहे. आधीच इंधनाचे वाढते दर, वाढती महागाईमुळे त्रासलेला रिक्षाचालक मेटाकुटीला आला आहे. या संदर्भात आज शहरातील विविध रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार आवाडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात, रिक्षा हे सार्वजनिक परिवहन असून त्याचे नियमन व नियंत्रण शासन-प्रशासनमार्फत चालते. रिक्षाचे दरवर्षी तंदुरुस्ती (योग्यता) प्रमाणपत्र घ्यावे लागते. ते घेताना विमा, विविध प्रकारची फी, गाडीच्या तंदुरुस्तीसाठी दुरुस्तीचा खर्च रिक्षाचालकांना करावा लागतो. त्यातून तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेण्यास थोडासा विलंब होतो. यापूर्वी तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी माफक फी भरुन अन्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळत होते. 
        परंतु केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळविण्यास विलंब केल्यास दररोज 50 रुपये दंड लागू केला आहे.या विरोधात मुंबई बस मालक संघटनेने उच्च न्यायालयात दाखल केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे 17 मे 2024 पासून महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्तांनी परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणत्रासाठी दररोज 50 रुपये दंड लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी, तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षाचालकांना मुदत मिळावी आणि मुदतीनंतर तंदुरुस्ती प्रमाणपत्र विलंबासाठी जाचक होणार नाही अशी रक्कम आकारावी, त्याचबरोबर दररोज 50 रुपये असलेला दंड रद्द करण्याच्या मागण्या केल्या आहेत. शिष्टमंडळात जीवन कोळी, मन्सुर सावनुरकर, रामचंद्र जाधव, लियाकत गोलंदाज, मारुती फडके, दीपक कोराणे, रियाज बागवान, बाळू खाडे यांच्यासह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top