सांगलीचे ज्यूस विक्रेते संतोष जगदाळे पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात वाचले

Admin

 मुंबई : हॅलो प्रभात

जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ हून अधिक जणांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही समावेश आहे. यातील एक नाव म्हणजे संतोष जगदाळे. पण, मंगळवारी ज्यावेळी दहशतवादी हल्ल्याची घटना घडली त्यावेळी महाराष्ट्रातून संतोष जगदाळे नावाच्या एक नव्हे तर दोन व्यक्ती पहलगाममध्येच होत्या. यावेळी दोघांचंही सारखंच नाव असल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.



पहलगामच्या हल्ल्यामध्ये पुण्याचे संतोष एकनाथ जगदाळे यांचा मृत्यू झाला. पण ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा सांगलीचे रहिवासी आणि ज्यूस विक्रेते संतोष लक्ष्मण जगदाळे हे देखील पर्यटनासाठी काश्मिरमध्ये आणि विशेषतः पहलगाममध्येच होते. माध्यमांमध्ये मृतांची नावे झळकली तेव्हा त्यात संतोष जगदाळे हे नाव देखील होते. 
थोडक्यात बचावले सांगलीचे संतोष जगदाळे
मी संतोष लक्ष्मण जगदाळे आहे. असेच नाव असलेले संतोष एकनाथ जगदाळे, या हल्ल्यात मारले गेले, तेही महाराष्ट्राचे होते, असे सांगली येथे ज्यूस सेंटर चालवणारे ४९ वर्षीय संतोष जगदाळे यांनी पीटीआयला सांगितले. मी पहलगामहून कारने त्या ठिकाणी गेलो होतो. आम्ही पोनी (घोडे) वापरणं टाळलं. आमच्या सोबत एकूण चार जण होते. मी, माझी पत्नी, माझा मित्र आणि त्याची पत्नी. आम्ही सगळे कारमध्ये होतो, गोळीबार सुरू होण्याच्या एक तास आधीच आम्ही त्या ठिकाणाहून परतलो होतो. हा निर्णय आमचे प्राण वाचवेल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आम्ही हॉटेलमध्ये परतल्यावरच काही वेळाने भीषण हल्ल्याची बातमी ऐकली, असं त्यांनी सांगितलं.
 सांगलीच्या संतोष यांच्या, घरी आणि नातलगांमध्ये एकच रडारड सुरू झाली. तेव्हापासून त्यांचा फोन सतत वाजतोय. रात्रभर आणि सकाळपासूनच लोक, नातेवाईक आणि मित्रमंडळी सातत्याने फोन करुन विचारपूस करीत आहेत, आणि मी जिवंत आहे, सुखरुप आहे असे सांगून संतोष जगदाळे थकून गेलेत.
To Top