गुंतवणुकीच्या आमिषाने ९२ लाखांची फसवणूक

Admin
गुंतवणुकीच्या आमिषाने ९२ लाखांची फसवणूक


 पुणे : हॅलो प्रभात

गुंतवणुकीच्या आमिषाने चौघांची ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार रविवारी (दि. २५) उघडकीस आला. याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात गौरव प्रदीपकुमार चंद्र (वय ४९, रा. महंमदवाडी, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पीटर शुक्ला आणि सॅमसन शुक्ला (रा. कॅलिफोर्निया अपार्टमेंट, एनआयबीएम रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



गौरव चंद्र यांची एका परिचितामार्फत आरोपी पीटर आणि सॅमसन यांच्यार्शी ओळख झाली होती. आरोपींनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा तीन ते सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, चंद्र व त्यांच्या परिचितांनी आरोपींच्या व्यवसायात ९२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, आरोपींनी त्यांना परतावा दिला नाही. परतावा न दिल्याने चंद्र आणि परिचितांनी शुक्ला यांना पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी परतावा, तसेच गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

Tags
To Top