![]() |
| लोणी काळभोर जिल्हा परिषद–पंचायत समितीत राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग |
लोणी काळभोर : हॅलो प्रभात
लोणी काळभोर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार रणशिंग फुंकले असून प्रचारात ‘घड्याळ’ चिन्ह आघाडीवर असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाचा फायदा ग्रामीण भागातही होताना दिसत आहे. त्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांनी ‘घड्याळ’ चिन्हालाच पसंती दिली आहे.
या भागाचे आमदार माऊली आबा कटके यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग आला आहे. सोशल मीडियासह प्रत्यक्ष प्रचारात राष्ट्रवादी आघाडीवर असून बहुतांश इच्छुकांनी मतदारसंघात एक ते दोन फेऱ्या मारून संपर्क वाढवला आहे.
मात्र, राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अनेकांना तिकीट न मिळाल्याने नाराजी वाढली आहे. काही इच्छुकांनी बंडखोरी करत भाजपचे ‘कमळ’ चिन्ह स्वीकारून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेने उमेदवार दिले असले तरी या निवडणुकीत खरी लढत राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ आणि भाजपचे ‘कमळ’ यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

