पालखी सोहळ्यात दुर्दैवी अपघात ; ट्रकच्या धडकेत सांगलीतील तीन वारकरी महिलांचा मृत्यू

Admin
पालखी सोहळ्यात दुर्दैवी अपघात
ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू

पुणे : हॅलो प्रभात
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन वारकरी महिलांचा मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. मृत्यूमुखी पडलेल्या तिन्ही महिला सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रज गावच्या रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रघुनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीचा ट्रक सासवड-जेजुरी मार्गावरील साईदीप लॉजजवळ सात वारकरी महिलांना धडकला. या अपघातात सर्व महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जेजुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तीन महिलांचा मृत्यू झाला. उर्वरित चार जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत.


अपघाताची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी जखमी वारकऱ्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली तसेच पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. जखमींवर तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्यात यावेत, तसेच आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघात कशामुळे झाला, याचा तपास सुरू असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तीन महिला सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रज गावच्या असून, चार महिला गंभीर जखमी आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

पालखी सोहळ्यावर शोककळा
जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी असतानाच हा अपघात घडल्याने पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली. वारकरी संप्रदायातही या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


To Top