वृध्द सेवाश्रम संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करू : ना.रामदास आठवले

Admin


 

सांगली डिजिटल हॅलो प्रभात 

वृध्द सेवाश्रम सांगली संस्था लोकसहभागातून निराधार वृध्द लोकांना सांभाळण्याचे चांगले कार्य करीत आहे. या संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहकार्य करू. संस्थेस खासदार फंडातून १५ लाख रूपये देऊ, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

            वृध्दाश्रमाचे देणगीदार स्वर्गीय विनायक राजाराम लिमये यांच्या नावे पार्श्वनाथ नगर सांगली येथे बांधावयाच्या वृध्द सेवाश्रमाच्या नविन इमारतीचा पायाभरणी शुभारंभ व कोनशिला अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वृध्द सेवाश्रम सांगली चे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी महापौर विवेक कांबळे व संगीता खोत, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, प्रकाश काळे, डॉ. उदय जगदाळे, अरूण आठवले, राजेंद्र खरात आदि मान्यवर उपस्थित होते.

            केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, वृध्द सेवाश्रम सांगली संस्थेने वृध्द लोकांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी घेतली असून ही संस्था सामाजिक कार्य करत आहे. सर्वांनी संस्थेच्या पाठीशी उभे राहून सामाजिक कार्यासाठी आपआपल्या मिळकतीमधून संस्थेस देणगी देणे आवश्यक आहे. जीवनात अनेक संकटे येत असतात. मुलांनी त्यांच्या आई वडिलांना सांभाळणे आवश्यक आहे. संस्थेच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




To Top