विवाहीतेच्या छळप्रकरणी पतीसह १० जणांवर गुन्हा

Admin

 

इचलकरंजी : डिजिटल हॅलो प्रभात

                    विवाहितेचा छळ करत घरात घुसून मारहाण, घराची तोडफोड, जाळपोळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या 10 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी पिडीत महिला आर्सिया असगर केरुरे (वय 24 रा. कुडचे मळा, इचल.) हिने फिर्याद दिली आहे. पीडित महिलेचे हुपरीतील असगर केरुरे याच्याशी लग्न झाल्यापासून सासरचे लोक घरातील काम करण्यासाठी लग्न करून आणले आहे, असे म्हणत तिला मानसिक त्रास देत होते. दरम्यान, अंगात भूत असल्याचे सांगून तिच्याशी अघोरी कृत्य केले आणि 40 तोळे सोने, चारचाकी गाडीची मागणी करत मारहाण करून घराबाहेर काढले. हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादीच्या वडिलांनी मध्यस्थी केली मात्र ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यावेळी लग्नात घातलेले 61 तोळे सोने, 10 लाख रुपये परत देण्याची मागणी केली असता सासरच्या लोकांनी परत करण्यास नकार दिला. 

                    त्यानंतर फिर्यादीच्या सासरच्या मंडळींनी तिच्या वडिलांच्या घरात जबरदस्तीने घुसून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी लाथाबुक्यांनी मारहाण करून तोडफोड, जाळपोळ करत नुकसान केले आणि फिर्यादीची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. या मानसिक, शारीरिक छळ प्रकरणी फिर्यादीने स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार असगर सलीम केरुरे, नुरजहाँ सलीम केरुरे, सलीम पापालाल केरुरे, शहारुख सलीम केरुरे, आफरोज शहारुख केरुरे (सर्व रा. हुपरी), हिना सलीम सनदे (रा. पुलाची शिरोली), शबाना फकिर, लुकमान फकीर (दोघे रा. रुकडी), मौलाना जावेद (रा. गडहिंग्लज) व मुजावर (रा. करवेश) या 10 जणांच्या विरोधात विविध 12 कलमानुसार गुन्हा दाखल झालाय. अधिक तपास स.पो.नि. रोहन पाटील हे करत आहेत.

To Top