विकास प्रकल्पाचे निर्माते डॉ.अण्णासाहेब डांगे (आप्पा)

Admin
सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
        सन १७८० साली पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी चौंडी येथे त्यांच्या भावांना बांधून दिलेली गढी खर्डा येथील मराठ्यांच्या बरोबर झालेल्या युद्धात निजामाने उध्वस्त करून इमारती जाळून खाक केल्या होत्या. पहिल्यांदा मा.आप्पा पहिल्यांदा चौंडीला गेले तेव्हा तो गढीचा भाग येड्या बाभळीनी वेढला होता. गढीच्या जवळच्या इमारतीमध्ये राहिलेले अवशेष होते, ते पाहायला सुद्धा तिथेपर्यंत जायला रस्ता नव्हता. त्यावेळेला मा. आप्पा विरोधी पक्ष नेते होते. त्यांच्या सोबत पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी बाभळीच्या फांद्या बाजूला करत थोडा रस्ता करत जायला वाट केली होती. तेथील ती अवस्था पाहून मा. आप्पांचे मन अस्वस्थ झाले. कसेबसे ते गढीपर्यंत गेले व त्या पडलेल्या वाड्याला वंदन करून तेथील माती घेऊन त्यांनी कपाळाला लावून त्याठिकाणी मनामध्ये दृढ निश्यच केला कि, “मी चौंडीचा कायापालट करीन.” यानंतर सन १९९५ साली महाराष्ट्रामध्ये शिवसेना - भारतीय जनता पार्टी युतीचे सरकार आले. हेच वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या २०० व्या पुण्यतिथीचे वर्ष होते. या कार्यक्रमासाठी मा. आप्पानी दिलेल्या निमंत्रणानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री ना. गोपीनाथराव मुंडे आणि मंत्रिमंडळाचे काही सदस्य अशा हजार- पंधराशे लोकांचा जमाव जमला होता. सीना नदी पाण्याने दुथडी वाहत होती. नदीवर पूल नसल्यामुळे अलीकडे पलीकडे यायला अडचण होत होती. म्हणून या कडेला व त्या कडेला दोन खांब रोऊन मोठा दोर बांधला होता. त्याला धरून कसे तरी लोक नदीच्या पलीकडून येत होते. त्यानिमित्ताने मा. मुख्यमंत्री यांनी जिल्हास्तर व राज्यस्तरावर उत्कृष्ट सामाजीक कार्य करणऱ्या महिलांना त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीचा गौरव म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार दिले जातील तसेच दहावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या मुलींना परगावी शिक्षणासाठी जावे लागल्यास एस.टी.चा मोफत पास दिला जाईल अशा प्रकारे विशेषता महिला कल्याणकारी १० योजना जाहीर केल्या व त्यांनी जाहीर आवाहन केले, “अण्णासाहेब डांगे यांनी चौंडी विकासाचा आराखडा तयार करावा. 
        महाराष्ट्र शासन त्यांना पैसा कमी पडू देणार नाही.” चौंडीचा विकास करायचा म्हणजे गढी पुन्हा बांधायची, अहिल्यादेवींच्या नावाने कीर्तीस्तंभ उभा करायचा असा आराखडा मा. आप्पांनी तयार केला. भूमिपूजन कार्यक्रम भारताचे तत्ल्कालीन राष्ट्रपती मा.शंकरदयाळ शर्माजी यांचा हस्ते संपन्न झाला. त्यावेळी नागपूरच्या रहिवाशी राष्ट्रीय सेवा समितीच्या भूतपूर्व कार्यकर्त्या व कार्यक्रमाच्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या अखिल भारतीय महिला मोर्च्याच्या अध्यक्षा सौ. सुमतीताई सुरळीकर यांना पहिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. १९९७ साली मा. आप्पा परदेश दौऱ्यावर असल्यामुळे अहिल्यादेवींच्या पुण्यतिथी कार्यक्रमास हजर राहू शकणार नव्हते म्हणून त्यांनी मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती केली की जास्तीत जास्त संख्येने जाऊन पुण्यतिथी साजरी करावी. मा. ना. नितीन गडकरी, मा. ना. एकनाथराव खडसे, मा. आमदार जगन्नाथराव पाटील, मा. ना. हरिभाऊ बागडे हे सर्व चौंडीला गेले व पुण्यतिथीच्या कार्यक्रमांमध्ये ना. नितीन गडकरी यांनी घोषणा केली, “मी माझ्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सीना नदीवर पूल बांधून व चापडगाव ते जामखेड व्हाया चौंडी या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करेन.” ना. एकनाथराव खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. त्यांनी घोषणा केली की, “चौंडी भागात पाण्याची मोठी टंचाई जाणवते म्हणून सीना नदीच्या पात्रात चौंडी गावाला उपयोगी पडेल असा कोल्हापूर टाईप बंधारा सिना नदीच्या पत्रात बांधून देईन. तसेच उजनी धरणाचे जादा होणारे पाणी चौंडीच्या शिवारातील ९५० हेक्टर जमिनीला कालव्याने आणायचे . 
        ना. जगन्नाथ पाटील, ना. हरिभाऊ बागडे यांनीही तरुणांसाठी तालीमगृह, अन्य सुधारणा त्यांना जे शक्य आहे ते करून देण्याचे आश्वासन दिले. युती शासनाचे सरकार जाऊन काँग्रेस पक्षाचे सरकार राज्यात आले. काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये ना. विजयसिंह मोहिते - पाटील यांच्याकडे पर्यटन विकास खाते होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठाचे परमपूज्य अदृश्यकाड सिद्धेश्वर स्वामीजी यांनी कणेरी मठाच्या विकासासाठी मठात येणाऱ्यांना आकर्षण निर्माण व्हावे म्हणून दीडशे वर्षापूर्वीच्या गावाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली होती. त्यामध्ये चावडी, पाटलाचा वाडा, बलुतेदारांची घरी अशी सर्वांची निर्मिती केली आहे. त्याचे उद्घाटन पर्यटन मंत्र्याच्या हस्ते व्हावे म्हणून मा. ना. विजयसिंह मोहिते-पाटील यांना निमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमात मा. आप्पांची त्यांच्याशी झालेल्या चर्चेचे फलित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी येथे शासनाच्यावतीने शिल्पसृष्टी उभारणेस मान्यता देणेत आली. पुढे पर्यटन विभागाच्या वतीने मा. अण्णासाहेब डांगे (आप्पाच्या) मार्गदर्शना व देखरेखी खाली शिल्पसृष्टीचे काम सुरु झाले. 
        मा.आप्पांच्या मार्गदर्शना खाली नवीन अशी संभाव्य शिल्पांची चित्रे रेखाटून तयार केली जायची. जिल्हाधिकारी व मा. आप्पा मिळून औरंगाबादला जाऊन क्ले मॉडेल मध्ये दुरुस्त्या करून घायचे. त्याप्रमाणे दर आठवड्याला साधारणपणे तीन-चार क्ले मॉडेल तयार व्हायची. ती सर्व शिल्पे पास करायला पाच - सहा आठवडे तिकडे जात होते. सन १९९५ ते २०२० या कालावधीत जास्तीत जास्त वेळ देवून काही वर्ष चौंडीत वास्तवास राहून त्यांनी चौंडी शिल्पसृष्टीचे काम स्वत:च्या देखरेखी खाली करून घेतले. एखाद्या व्यक्तीचे स्मारक म्हणजे त्याचे पुतळा, त्याच्या कामाची चित्ररूप माहिती इथपर्यंत मर्यादित रहाते पण मा. आप्पांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे स्मारक उभारत असताना त्यामध्ये गढी, मुख्य प्रवेशद्वार, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा, त्याचा मागे महेश्वर घाटाची प्रतिकृती आणि कीर्तिस्तंभ, अहिल्येश्वर मंदीर, श्री मारुती मंदीर, अहिल्यादेवींच्या मातोश्री, पिताश्री आणि दोन भावांचे समाधी स्थळ, ग्रामदेवता चौंडेश्वरी माता मंदीर, सिनेश्वर मंदीर, अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित २२ शिल्पे, अहिल्यादेवींचे निवासस्थान व तळघर, राजमहल, चावडी, दरबार हॉल, राशी आणि नक्षत्र उद्यान, इत्यादीमुळे चौंडीला मा. अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांनी एक वेगळे वैभव प्राप्त करून देवून पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले. येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था व्हावी व त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात तसेच चौंडीतील तरुणांना रोजगार मिळावा, 
        उदरनिर्वाहाचे साधन निर्माण व्हावे याकरीता दुकानगाळे उभा करून दिले. चौंडी व परिसरातील महिलांच्या उन्नतीसाठी पुण्यश्लोक गारमेंट सुरु केले. यापुढे ही भक्तनिवासाचे बांधकाम, होळकर शाहीचा इतिहास सर्वाना कळावा, त्यावर अभ्यास करता यावा साठी अभ्यासाकेंद्र असे नवनवीन उपक्रम सुरु करणेचे मा. आप्पांनी नियोजित केले आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारे मा. डॉ. अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांना ८७ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
- अजित पाटील
मु.पो.गोटखिंडी, ता.वाळवा, जि.सांगली.
To Top