दिव्यांग वर्गातील शाळांना शिक्षक पद मान्यता मंजुरी मिळावी : पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे मागणी

Admin

 

कडेपूर :डिजिटल हॅलो प्रभात
                सांगली जिल्ह्यात गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील शाळांना पदनिर्मितीस मंजुरी मिळण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील विशेष शाळेतील संस्थाचालक व शिक्षकांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे केली. पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन पृथ्वीराज देशमुख यांनी दिले.
            जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील मतिमंद, अस्थिव्यंग, अंध, अपंग, मतिमंद व कार्यशाळा, मूकबधीर निवासी शाळा या दिव्यांग वर्गातील विशेष शाळा गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत. या शाळेत अनेक शिक्षक ज्ञानदान करण्याचे पवित्र काम करत आहेत. या सर्व शाळा चालवताना संस्थाचालकांनी पदरमोड करून शाळा चालवल्या आहेत. या सर्व शाळेतील शिक्षकांना शासन सेवेत सामावून करून घेण्यासाठी शिक्षकांनी अनेक वेळेला प्रयत्न केले, मात्र शासनाने दाद दिली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विशेष शाळेचे संस्थापक व शिक्षकांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना भेटून जिल्ह्यातील सर्व विशेष शाळेतील शिक्षकांना पद मान्यता मिळण्यासाठी समाजकल्याण विभागातून वित्त विभागास प्रस्ताव सादर होण्यासाठी विनंती केली.
            यावेळी पृथ्वीराज देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. जिल्ह्यातील सर्व विशेष सहाय्य शाळेतील शिक्षकांची पदे मान्यता देण्याबाबत चर्चा केली. समाजातील दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग वर्गातील विशेष शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी ताकदीने काम करणार असल्याचे पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले. यावेळी शक्तीकेंद्र प्रमुख राजेंद्र मोहिते, जिव्हाळा जनकल्याण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष कृष्णत मोकळे, विश्वबाळा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी, संस्थेच्या सचिव लक्ष्मी कदम, मुख्याध्यापक प्रमोद पाटील (कार्वे), सुहास शिंदे (सांगली), गणेश शेटे (आटपाडी), मनिषा कुंभार (पारे), अवधूत पाटील (नेर्ले), अमोल पाखले (बलवडी), शहाबाज उगारे (सांगली), सागर जाधव (विटा), मुरलीधर पवार (पलूस), पंढरीनाथ पाटील (तांबवे), भाग्यश्री इंगळे (सांगली), असावरी धनंजय हर्षद (सांगली), हिना पाटील (पुणदी), काजल कदम (पलूस), कविता कदम (पलूस), प्रियांका जाधव (आष्टा) यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top