तासगाव : अतुल काळे
पत्नीच्या बँक खात्याची केवायसी करण्याची माहिती घेण्यास गेलेल्या पतीला शाखाधिकार्यांकडून '...तर मी काय करू' उत्तर मिळाल्याने धक्का बसला. याबाबत माहिती अशी की, तासगावात वंदे मातरम चौक येथे असणाऱ्या एका राष्ट्रीयकृत बँकेत पत्नीच्या बचत खात्याची के.वाय.सी. करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेण्यास गेलेल्या पतीला बँकेतील कर्मचाऱ्यांनी के.वाय.सी. बाबत सविस्तर माहिती दिली नाही. सदरची बाब शाखाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून कानावर घातली. बँकेतील कर्मचारी व्यवस्थित माहिती देत नाहीत असे सांगितले असता, 'त्याला मी काय करू' असे उत्तर शाखाधिकार्यांकडून मिळाल्याने खातेदाराचा पती आश्चर्यचकित झाला. तक्रारदार स्वतः तासगाव मधे एका जीवन विमा कंपनीत नोकरीस असून बँक कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळाले नसल्याने व शाखाधिकारी यांच्याकडून मिळालेल्या उत्तराने व्यथित झाले. बँकेच्या शाखेतील कर्मचाऱ्यांची तक्रार शाखाधिकार्यांकडे केल्यावर अशा प्रकारचे उत्तर मिळाल्याने पत्नीचे बचत खाते या बँकेत काढून पश्चाताप झाला असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
संबंधित बँकेमध्ये खातेदारांची मोठी वर्दळ असते. बँक पासबुक मधे तात्काळ छपाई करून मिळत नाही, जुने पासबुक असल्यास नवीन पासबुक घ्या असा सल्ला दिला जातो. नवीन पासबुक येण्यासाठी पंधरा दिवस लागतील हेही सांगितले जाते. अशा एक ना अनेक अडचणी खातेदारांसमोर आहेत. या बँकेची ग्राहक सेवा केंद्र देखील आहेत. परंतु प्रत्येक खातेदाराला ग्राहक सेवा केंद्र मधून त्यांची कामे पूर्ण होतील असे नाही. महत्त्वाच्या कामासाठी खातेदाराला बँकेमध्ये यावेच लागते. बँकेतील गर्दी आणि अधिकाऱ्यांकडून होणारा मनस्ताप यामुळे खातेदार हैराण झालेला दिसून येत आहे. आर्थिक बाबतीत बँकिंग लोकपाल यांच्याकडे तक्रार करता येते, पण लहान गोष्टींची तक्रार आता कोणाकडे करावी ? असा प्रश्न खातेदारांना पडला आहे.