‘फक्त भुजबळ उभे राहुद्या, मग सांगतो'
मनोज जरांगेंचा इशारा
पुणे : डिजिटल हॅलो प्रभात
महायुती' च्या जागावाटपाचा तिढा अजून पूर्णपणे सुटलेला नाही. नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. या जागेवर सुरुवातीला भाजपकडून दावा केला जात होता. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेनेच्या कार्यक्रमात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण त्यावरुन भाजपमध्ये नाराजी असल्याची बातमी समोर येत होती. या नाराजीबाबत विविध चर्चांना उधाण येत असतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाशिकच्या जागेवर दावा केला जातोय. दुसरीकडे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे देखील नाशिकच्या जागेवर दावा सांगत आहेत. गोडसे गेल्या 10 वर्षांपासून नाशिकचे विद्यमान खासदार आहेत. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असून छगन भुजबळ हे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे. पण यावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. अशातच नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिलाय. मनोज जरांगे आज पुण्यातील देहूत संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भुजबळांबद्दल जास्तीचं काही विचारू नका, त्यांनी लोकसभा लढायचं अंतिम केल्यावर सांगतो, असा इशारा जरांगेनी भुजबळांना दिला.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जरांगेंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. अशातच भुजबळ नाशिक लोकसभेतून नशीब अजमावणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यालाच अनुसरून पत्रकारांनी जरांगेना प्रश्न विचारला असता, “मराठा समाजाला राज्यभर कोण-कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं हे ठरवावं. पण नाशिक लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले, तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो”, असा इशारा जरांगेनी थेट भुजबळांना दिला.