कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून खासदार पोहोचले थेट रुग्णालयात..!

Admin
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून 
खासदार पोहोचले थेट रुग्णालयात..!

अहमदनगर : डिजिटल हॅलो प्रभात 
राज्यातील लोकसभा निवडणुका सुरुळीत आणि किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडल्या. परंतु , निवडणुकांवेळी कार्यकर्त्यांमध्ये असलेला तणाव अद्यापही कायम आहे. अहमदनगर मतदारसंघातून निलेश लंके विजयी झाल्यानंतर, त्यांच्या मतदारसंघात राडा झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये खासदार निलेश लंके  यांच्या समर्थकाची गाडी फोडल्याची घटना घडली. खासदार लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पारनेर शहरातच आठ ते नऊ जणांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच आमदार निलेश लंकेंनी आपला नियोजित दौरा सोडून रुग्णालयाकडे धाव घेतली. अधिकमाहिती अशी, पारनेर शहरात आठ ते नऊ जणांनी राहुल झावरे यांना मारहाण करत त्यांची गाडी फोडून टाकली. या मारहाणीत राहुल झावरे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सध्या पारनेर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेनंतर आता खासदार निलेश लंकेंनी संताप व्यक्त केला आहे.

पारनेर येथील हल्ल्यात जखमी झालेल्या राहुल झावरे यांची खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली. दरम्यान, श्रीगोंदा येथे असलेल्या खासदार लंके यांनी आपला भेटीचा दौरा अर्ध्यावर सोडत राहुल झावरे यांना भेटण्यासाठी नगर गाठलं आणि रुग्णालयात जाऊन प्रकृतीची चौकशी केली. झावरे यांच्या मणक्याला आणि पोटाला मार लागला आहे. पारनेर येथीलच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून ही मारहाण झाली आहे, गुन्हेगार कोणीही असो त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचं खासदार लंके यांनी यावेळी म्हटलं. 

निवडणूक संपली आहे, तुमचा विजय झाला तरी पचवता आला पाहिजे आणि पराभव झाला तरी पचवता आला पाहिजे, असं म्हणत लंके यांनी सुजय विखेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. दरम्यान, या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी सर्व कार्यकर्त्यांना शांततेची भूमिका घ्यावी, असं आवाहन केलं आहे, असं देखील लंके यांनी म्हटले.
To Top