ओबीसींच्या न्यायासाठी पक्षाचा विचार न करता उभे रहा : प्रा.लक्ष्मण हाके
मनोज जरांगे यांचे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. त्यांनी आमदार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. याला माझा पाठिंबा आहे. राज्यातील आमदारांनी ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी पक्षाचा विचार न करता ओबीसींच्या पाठीमागे उभे रहावे. जे आमदार आमच्यामागे उघडपणे येणार नाहीत. त्यांच्याबाबत येत्या विधानसभा निवडणुकीत समाजाने क्रांतीकारक निर्णय घेईल, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सांगली येथील तरूण भारत स्टेडियमवर रविवार दि. ११ ऑगस्टला ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी लक्ष्मण हाक्के सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसींच्या काही मागण्यांबाबत प्रकाश आंबेडकरही आमच्या मताशी सहमत आहेत. आता मागण्यांसाठी रस्त्यावरील लढाई केल्याशिवाय पर्याय नाही. सांगली जिल्ह्यातील आठ आमदार,खासदारांनी ओबीसी समाजाच्या मागणीला पाठिंबा द्यावा, अन्यथा यापुढे आम्हाला गृहीत धरु नये. जिल्ह्यातील साखर कारखानदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, संचालक यांनीही आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचे मत यांनी व्यक्त केले. हाके पुढे म्हणाले, आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संसदेच आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक ठिकाणी गेल्या चार-पाच वर्षापासून घेतलेल्या नाहीत. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या निवडणुका झाल्या पाहिजेत. मात्र ओबीसी आरक्षणाच्या वादावर न्यायालयाने तीन वर्षात एकही सुनावणी घेतलेली नाही. ही बाब चिंताजनक आणि लोकशाहीला मारक आहे. यामुळे या संस्थांचा कारभार प्रशासन आणि बाबू लोकांच्या हाती गेला आहे. आरक्षणाचा निर्णय लवकर घेवून तातडीने निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
माजी महापौर संगीता खोत यांनी मेळाव्याची माहिती दिली. दि. ११ ऑगस्टला होणाऱ्या मेळाव्यासाठी ओबीसी समाजाचे नेते ना. छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय बढेटीवार, ना.धनंजय मुंडे, आ.पंकजा मुंडे, महादेव जानकर,प्रकाश शेंडगे, आण्णासाहेब डांगे, शब्बीरभाई अन्सारी, आ.गोपीचंद पडळकर, नवनाथ वाघमारे, अॅड. मंगेश ससाणे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विष्णू माने, संग्राम माने, सविता मदने, कल्पना कोळेकर, विठ्ठल खोत, सुनील गुरव, राजेंद्र कुंभार, संजय विभूते, प्रदीप वाले, यांच्यासह सर्वपक्षीय ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते.