![]() |
‘टाइम 100 फिलॅंथ्रॉपी 2025’ च्या जागतिक यादीत मुकेश आणि नीता अंबानी यांचा समावेश |
मुंबई : हॅलो प्रभात
प्रसिद्ध अमेरिकन मासिक ‘टाइम’ ने आपली पहिली ‘टाइम 100 फिलॅंथ्रॉपी 2025’ यादी जाहीर केली आहे. या यादीत अशा १०० जागतिक व्यक्तींचा समावेश आहे, जे दानशूरता व समाजसेवा यांच्या माध्यमातून भविष्य घडवताना दिसत आहेत. या प्रतिष्ठित यादीत भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांचाही समावेश झाला असून, हे भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा नीता अंबानी यांनी २०२४ मध्ये एकूण ₹४०७ कोटी (सुमारे $४८ दशलक्ष) चे दान दिले. या योगदानामुळे ते देशातील सर्वांत मोठ्या दात्यांपैकी एक ठरले असून, त्यांनी जागतिक स्तरावरही आपली परोपकारी दृष्टीकोन सिद्ध केला आहे.
अंबानी दांपत्याच्या या सामाजिक उपक्रमांमुळे शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, क्रीडा आणि आपत्ती मदत या क्षेत्रांमध्ये लाखो भारतीय नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या, महिलांसाठी करिअर प्रशिक्षण, शाश्वत शेतीसाठी ग्रामीण समुदायांना मदत, जलसंवर्धन, रुग्णालयांचे बांधकाम, दृष्टिदोषांवरील उपचार सुविधा आणि शाळांचे पायाभूत सुविधा बळकट करणे यांचा समावेश आहे.