महाआरोग्य शिबीर संपन्न |
वारणानगर : डिजिटल हॅलो प्रभात
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ फेब्रुवारी रोजी कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रामधे महा आरोग्य शिबीर संपन्न झाले.कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रामधे दररोज शंभर ते दीडशे रुग्णांची तपासणी केली जात असून नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा तसेच शासकीय आरोग्यसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.जयदीप रेवडेकर यांनी रुग्णांना केले.
कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रामधे गरोदर मातांची तपासणी करुन मोफत प्रसूतीही केली जाते,त्यामुळे महिलांनी आणि गरोदर मातांनी या सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन स्रीरोगतज्ञ डॉ.गराडे यांनी केले.
उपकेंद्रस्तरावर उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांची तपासणी करुन निदान झालेल्या रुग्णांना दर महिन्याला या आजारांची औषधे मोफत मिळत असून नागरिकांनी आपल्या गावातील उपकेंद्रामधे उच्च रक्तदाब आणि मधुमेह याची नियमीत तपासणी करुन घेण्याचं आवाहन उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत जाधव यांनी रुग्णांना केले. शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झालं.जागरूक पालक आणि सदृढ बालक या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.तसेच रुग्णांची सर्वसाधारण तपासणी,कान नाक घसा,उच्च रक्तदाब आणि मधुमेह,गरोदर माता तपासणी तसेच रक्तदान शिबीर याचा महा आरोग्य शिबीरामधे समावेश होता.एकूण चारशे नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.
याप्रसंगी कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जयदीप रेवडेकर,डॉ.कैलास गीते,सुपरवायझर,एलएचव्ही,उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत जाधव,डॉ.गराडे,आरोग्यसेवक,समुदा य आरोग्य अधिकारी,परिचारिका आणि रुग्ण उपस्थित होते.