लैंगिक अत्याचार प्रकरणी कोळी पोलिस हवालदार निलंबित
पोलिस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांची कारवाई
सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलीस हवालदार स्वप्नील विश्वास कोळी (रा. शिरोळ ) याच्यावर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गुरुवारी निलंबनाची कारवाई केली.
सतरा वर्षीय पीडितेच्या फिर्यादीची दखल घेऊन पोलिसांनी संशयित कोळी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटकही केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईचा अहवाल समोर येताच पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी संशयित कोळी याच्यावर निलंबनाची कारवाई केली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे , मूळची बांगलादेशी असलेल्या मुलगी जानेवारी २०२२ पासून सांगलीत स्वरुप चित्रमंदिराजवळील वस्तीत एका महिलेकडे रहात होती. या दरम्यान हवालदार कोळी याने पीडितेवर वर्षभरात दोनवेळा लैंगिक अत्याचार केले. या दरम्यान संशयिताने पीडितेकडून सुरुवातीला दोन लाख, तर पोलिसांचा छापा पडण्याआधी माहिती दिल्याबद्दल संबंधित मुलीस आश्रय देणाऱ्या महिलेकडून पाच लाख वसूल केले. गेले वर्षभर याबाबत न्यायालयात संबंधित पीडितेने दाद मागितली होती. अपर पोलिस अधीक्षकांकडे हा तपास होता. पुणे येथील रेस्क्यू फौंडेशनच्या संरक्षण बालगृहात संबंधित मुलीला हलवले आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली गेली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अजित टिके हे करत आहेत.