माणसांना भक्तीचा सन्मार्ग दाखवणारा सद्गुरू ; आदमापुरचे संत बाळुमामा

Admin

 

मुरगूड : डिजिटल हॅलो प्रभात 
अत्यंत कष्टाच्या खडतर जीवनक्रम असणाऱ्या धनगर समाजात बाळूमामा चा जन्म झाला. सूर्याची सोनेरी किरणे सृष्टी कवटाळू पाहत असताना शके १८९४ मध्ये आश्विन महिन्याच्या पहिल्या एकादशीनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला दुपारी चार वाजून २३  मिनिटांनी मानवी जीवनातील दुःखाचा अंधार घालवून संसाराचा  भवसागर पार करण्यासाठी भक्तीचा सन्मार्ग दाखवणारा हा संत प्रकट झाला. अठरा विश्व दरिद्र्य नारायणाचे वास्तव असणाऱ्या घरात हा सौभाग्याचा क्षण होता.बालपणात बाळूमामा ला कोणी ओळखले नव्हते. त्यांचे विचित्राअवस्थेतील वागणे समाजाला विस्मयकारक होते. लहान मुलातील दंगामस्ती आणि वात्रटपणा न आढळता गंभीर विचार अवस्थेमुळे आई-वडिलांना चिंता लागली .मुलग्याला कामात गुंतवण्याच्या हेतूने बाळूमामा म्हणजे बालपणातील बाळाप्पा ला अकोळच्या चंदुलाल शेठजीच्या घरी जनावरे राखण्यास ठेवले. बाळापाला दिलेल्या जेवणाच्या थाळीत शेठजीच्या बायकोला जैन मंदिराचे दर्शन झाल्याने तिने ती थाळी देव्हाऱ्यात पुजली. छोट्या बाळापाला हे रुचले नाही त्याने हे काम सोडून दिले.
वीस वर्षे वयाच्या बाळाप्पा पुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवताच त्याने स्पष्ट नकार दिला. अनिष्ठेने जबरदस्तीने बहिणीच्या सत्यवा नावाच्या कन्येशी विवाह झाला. यावेळी मामाने आम्ही देवाचे चाकर असून प्रपंच भोग हा नश्वर आहे असा नकार देऊन त्यांना संसार सागरात गुंतवले गेले. सासूच्या घरातील सर्व मुले लहान असल्यामुळे ते बाळाप्पाला मामा म्हणू लागली. तेव्हापासून मामा हे नाव प्राप्त झाले व ते कायम राहिले. पुढे बाळूमामा स्वतंत्र मेंढपाळाचा व्यवसाय करू लागले. काटे- कुटे, ऊन -वारा ,पाऊस याची पर्वा न करता सतत भटकत राहायचे असा हा व्यवसाय. या भटकंतीत त्यांनी आपल्या वाणीतून उपदेश पर अनेक संदेश दिले. परस्त्री  मातेसमान मानणे व काही उन्मत मुलींना त्यानी प्रायश्चित्त दिले. त्यामुळे त्यांच्या आचरणाची ख्याती पसरू लागली.बकरी घेऊन कर्नाटक भागाकडे येत असताना रखरखत्या उन्हात तृष्णा भागवण्यासाठी मामा विहिरीच्या शोधात भटकू लागले. एक विहीर दृष्टिक्षेपात येताच खोलवर धोक्याच्या विहिरीत महाप्रयासाने ते उतरले. पाण्याने भरलेला तांब्या घेऊन विहिरीच्या काठावर येताच दोन जटाधारी भगवी वस्त्रे परिधान केलेले बैरागी पाण्यासाठी याचना करू लागले. ज्यांचे परोपकारा वाचून अन्य जीवनध्येयच नव्हते. अशाना मामाने दया दाखवून तीन चार वेळा पाणी देऊन त्यांची तहान भागवली. आनंदा पोटी त्या बैराग्यानी यापुढे तू जसे बोलशील तसे घडत जाईल ,तू जे जे करण्याचे ठरवतील तेथे संपूर्ण यशस्वी आणि पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला अन् घडतही गेले तसेच. आपल्या पूर्ण आयुष्यात विविध चमत्काराने योग सामर्थ्याच्या बळावर खोट्याचा पडदाफाश तर खऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अर्थात मामांचे विविध चमत्कार आजच्या विज्ञान युगात विज्ञानवादी लोकांना कळणार नाहीत. माणसांना सन्मार्गाला लावणे हाच त्यांचा एकमेव हेतू प्रत्येक चमत्कृति मागे होता. सर्वसामान्य जणांचा ओढा भक्तिमार्गाकडे लावणे ,सामाजिक संतुल राखणे, अन्यायाला मूठ माती देणे, समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा यांना काळाच्या गरजेनुसार रितसरपणे त्यामध्ये बदल घडवून आणण्याचे कार्य केले. आपल्या भक्तातील अंधश्रद्धा, दुष्टपणा आणि अविचारीपणा शिव्या देऊन धाकाने पाश्चातापाने घालवून त्याला सन्मार्गांना लावतो. अहिंसावर्तीचे पालन करण्यास शिकवले.
!! मामा दयेची मूर्ती भक्ता ते समजाविते देवांना आवडीची चित्ती मास रक्त !!
संताना आपल्या भक्तांची फार काळजी लागून राहिलेली असते .बाळूमामा म्हणत तू माझ्याकडे येऊ नकोस, मी तुझ्याकडे येतो अशा प्रवृत्तीचे बाळूमामा स्वतःच भक्त जिथे असतील तिथे जाऊन भेटून त्यांचे दुःख चिंता दूर करत असत.संतांच्या निकटच्या नातलगांना सहसा संतांची खरी योग्यता कळत नसते. बाळुमामाची पत्नी सत्यवा व मामामध्ये नेहमी खटके उडत. गरोदर असताना बकऱ्यांचा तळ कापशी मुक्कामी होता त्यावेळी सोबत सासू गंगुबाई आणि सत्यवाला रिंगण आखून बाहेर न जाण्याची सक्त ताकीद देऊन बाळूमामा गाढ झोपी गेले.आज्ञा मोडून बाहेर जाणाऱ्या गरोदर सत्यवाचा गर्भपात झाला. या प्रसंगा नंतर स्वतःचा असा संसार संपला.नंतरच्या आपल्या एकट्याच्या भटकंतीत अनेक भक्तांना अनेक प्रसंगातून सन्मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला .त्यांच्या चमकृती प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवणारे अनेक भक्त आजही आपल्या हयातीत या बाबी शब्दबद्ध करून मामांच्या चरणी नतमस्तक होतात. वयाच्या 74 व्या वर्षी मामांचे सगुण रूप अदृश्य झाले. समाधी पूर्वी एक दोन वर्षे सुचक शब्दानी मामा आपल्या समाधी विषयी कल्पना देत होते. ते गुढ वेदांत शास्त्र पर वचने बोलत होते .तथापि बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत झाले नाहीत .अनेक भक्तांना स्वप्नात व काहींना प्रत्यक्षात प्रकट होऊन तशा प्रकारच्या त्याने सूचना दिल्या होत्या. 1966 साली अखेर देवतांना मामानी आपण प्रकाश रूप म्हणजे ब्रह्मरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय आदमापुर ता. भुदरगड येथील मरगुबाईच्या मंदिरात त्यावेळी माणसांना दिला. त्यांचा पवित्र देह समाधीत आहे हे खर आहे, पण आजही भक्तांच्या सुख व मनोकामना पुरवण्यात मामा समर्थपणे प्रयत्नशील आहेत. 
:-  संदीप सूर्यवंशी, मुरगूड 


To Top