मारुती पाटील पतसंस्थेत अडीच कोटींचा अपहार :अध्यक्षासह तिघांना अटक

Admin

 

सांगली  : डिजिटल हॅलो प्रभात 
वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील मारुती उर्फ तात्या पाटील पतसंस्थेमध्ये २ कोटी ४७ लाख ६२ हजार ६१ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्षासह तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केली आहे. इस्लामपूर येथील सहकारी संस्थेचे अप्पर लेखपरिक्षक राजेंद्र पाटील यांनी या पतसंस्थेचे दि. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत लेखापरिक्षण केले होते. त्यामध्ये अपहाराचा प्रकार उघडकीस आला.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष स्नेहलकुमार मानसिंग पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आनंदराव पाटील (रा. दोघेही बोरगाव ) आणि सचिव अरविंद जनार्दन पाटील (रा. कापूसखेड ता. वाळवा ) यांचा समावेश आहे. अपहार उघडकीस आल्यानंतर अप्पर लेखापरिक्षक राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दि. ११ जानेवारी २०२३ रोजी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दरम्यान गुन्ह्यातील फसवणूकीची व्याप्ती मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. तपासकामात मारुती उर्फ तात्या पाटील पतसंस्थेचा निधीचा गैरवापर करणे, कर्जवसुलीच्या रकमा जमा न करणे, संस्थेकडून रक्कम अदा करुन स्वत:चे नावावर नोटरी करुन घेणे, कर्ज येणे असताना कर्जदारांना नाहरकत दाखले देणे, कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन कागदपत्र सादर करणे आदीच्या माध्यमातून संशयीतांनी पतसंस्थेत २ कोटी ४७ लाखाचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याने तिघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. सदरच्या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरिक्षक महेंद्र दोरकर, तसेच सहाय्यक फौजदार अमोल लोहार, पोलीस हवालदार इरफान पखाली, उदय घाडगे, दिपक रणखांबे, कुलदीप कांबळे, विनोद कदम आदींनी सहभाग घेतला.


To Top