बाजार समितीत कठोर निर्णय हवेत : पृथ्वीराज पाटील

Admin

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 

        सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. समिती संकटातून जात आहे. व्यापार टिकवण्याचे आणि वाढवण्याचे आव्हान खडतर आहेत. अशावेळी सत्ता राबवताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याबाबत मी महाविकास आघाडीचे नेत्यांशी चर्चा करणार आहे. काही बदल करावेच लागतील, अशी भूमिका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे व्यक्त केली.

         श्री.पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांची ही बाजार समिती आहे. येथील सुविधांबाबत व्यापारी, हमाल, तोलाईदार, शेतकरी सगळेच नाराज आहेत. गेल्या काळात काय घडले, याबाबत आता बोलण्यात अर्थ नाही. बाजार समितीच्या सर्व आवारां मध्ये या घटकांना उत्तम रस्ते, व्यापार वाढीसाठी सुविधा, शेतकरी निवास, हमाल व तोलाईदारांना सोयी-सवलती या गोष्टी महत्वाच्या आहेत. व्यापार वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचा आहे. हळदीचा व्यापार कमी झाला आहे. धान्य व्यापार कर्नाटकात रोखला गेला आहे. त्याला इथला ८५ पैसे सेस कारणीभूत मानला जातोय. त्यात बदल करून तो खाली आणावा लागेल.हमाल व व्यापारी यांचेमध्ये समन्वय साधणे साठी संचालकांनी पुढाकार घ्यायला हवा.

        हळदीची सांगली ही ओळख जपण्यासाठी प्रयत्नपूर्वक जिल्ह्यात हळदीचे पीक वाढवावे लागेल. दक्षिण भारतातून येणारी हळद हिंगोली, वसमतऐवजी पुन्हा सांगलीकडे कशी येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. बेदाणा ही आपली मोठी ताकद आहे. बेदाणा उत्पादकांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा, स्पर्धात्मक उत्तम दर, कमी दरात साठवण व्यवस्था निर्माण करणे ही बाजार समितीने जबाबदारी उचलण्याची गरज आहे. वसंतदादा मार्केट यार्ड आणि विष्णूअण्णा फळ मार्केटची अवस्था बिकट आहे. फळ व्यापारात वाढीसाठी तसेच फळ व्यापाऱ्यांना सोयी देणे यासाठी तातडीने निर्णय घ्यावे लागतील.


To Top