मायलेकाचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन दुर्देवी मृत्यू : प्रथम मुलाचा नंतर आईचा मृत्यू

Admin

 

पन्हाळा : डिजिटल हॅलो प्रभात (किरण मस्कर)
        कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळामध्ये अंत्यत दुर्दैवी घटना घडली आहे. नेबापूर हद्दीतील जगताप शेत नावाच्या ठिकाणी तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.एका बाजूला राज्यभरात सर्वत्र भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा सण उत्साह सुरू असतानाच कोल्हापूरमध्ये मात्र मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे कामासाठी गेलेल्या मायलेकाचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणच्या कारभारावरही टीका होऊ लागली आहे.
        याबाबत घटना स्थळावरून माहिती समोर आली आहे. पन्हाळा येथे राहणारा अजिंक्य मगदूम (वय वर्ष ३३) आणि त्याची आई नंदा मगदूम (वय वर्ष ४९) यांचे नेबापूर गावच्या हद्दीत शेत आहे. अजिंक्य हा सकाळी ७ च्या सुमारास स्व मालकीच्या शेतात मशागतीची कामं करण्यासाठी गेला होता. वेळ झाला म्हणून आई मुलाला बघण्यासाठी शेतात गेली. त्यावेळी हातात विद्युत तार पकडलेल्या अवस्थेत मुलगा अजिंक्य निपचित पडलेला दिसला. घाबरून आईने धावत जाऊन मुलाला स्पर्श करताच तिला सुद्धा विजेचा जोरदार धक्का बसला आणि तिचाही मृत्यू झाला. आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी ही घटना पाहताच आरडाओरडा केला. यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पन्हाळा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला.
            सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडण्याच्या घटना घडत आहेत. अशातच मगदूम यांच्या शेतामध्येही तुटलेल्या विजेच्या तारा पडल्या होत्या. विजेच्या तारा पडलेल्या असतानाही महावितरणने खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडित न केल्याने या तारांचा स्पर्श मायलेकांना झाला आणि जोरदार धक्का लागला. महावितरणच्या गैरकारभारामुळे दोघांचा जीव गेला, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
To Top