विजेच्या धक्क्याने तरुण कंत्राटी वायरमनचा मृत्यू

Admin

गगनबावडा :  डिजिटल हॅलो प्रभात
                    वीज वितरणच्या खांबावर काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू झाला. गगनबावडा तालुक्यातील पळसंबे पैकी मानेवाडी येथे आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. कु.अमित प्रकाश माने (वय २५ वर्ष) रा.पळसंबे असे मयत तरुणाचे नाव आहे.
                    याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, वीज वितरण कंपनीच्या गगनबावडा उपविभागा अंतर्गत येणाऱ्या पळसंबे या गावात अमित माने हा वीज वितरणचा कंत्राटी वायरमन म्हणून गेली अनेक वर्षे काम करत होता. आज दुपारी तो वीज पुरवठा दुरुस्त करण्यासाठी विजेच्या खांबावर चढला असता त्याला विजेचा जोराचा धक्का बसला. सदरची घटना घडताच ग्रामस्थांनी वीज पुरवठा खंडित करण्याची सूचना केली. सदरची घटना समजताच ग्रामस्थांनी वीज वितरणच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला. अमित यास उपचारासाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. 
बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला : 
मयत अमित याचा दोनच दिवसापूर्वी विवाह ठरला होता. विवाह मुळे त्याच्या घरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र मात्र बोहल्यावर चढण्यापूर्वीच आज त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अमित याच्या पश्चात आई, वडील व एक विवाहित बहीण आहे.
                    उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तालुक्यातील आसपासच्या ग्रामस्थांनी गगनबावडा उपविभागीय वीज वितरण कार्यालयावर धाव घेतली. सदरची घटना वीज वितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे घडल्यांचा आक्षेप घेत संबंधित कर्मचाऱ्यासह जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने जमाव गगनबावडा येथे जमा झाला. वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी गगनबावडा येथे येऊन ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका जमावाने घेत ठिय्या आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी गगनबावड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी मोठा फौजफाटा मागवून घेतला. घटना घडून पाच तास उलटले तरी वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी गगनबावडा कार्यालयाजवळ पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे जमाव संतप्त झाला. जमावाला शांत करण्याची प्रयत्न पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
महावितरणच्या गलथान कारभार ; विजेचा धक्का बसण्याची दुसरी घटना
महावितरणच्या गलथान कारभारामुळे गगनबावडा तालुक्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराबाबत विजेचा धक्का बसण्याची ही दुसरी घटना आहे. पहिल्या घटनेत एकाला अपंगत्व आले असून दुसऱ्या घटनेत जीव गमवावा लागला आहे.
                    कोल्हापूर ग्रामीणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता साळी हे रात्री साडेसातच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी दिलेले आश्वासन अमान्य झाल्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. संतप्त जमावाला वीज वितरण कडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी जमाव पोलीस स्टेशनकडे वळला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
To Top