राहुरी : डिजिटल हॅलो प्रभात (रमेश खेमनर)
महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा असून या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा न मिळणे ही अहमदनगर जनतेच्या दृष्टीने खेदाची बाब आहे. हा विषय रुग्णांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असल्याने प्रशासनाने गांभीर्याने या विषयांची नोंद घेऊन रुग्णहीत लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेकरिता लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे ई- निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे नियोजन आहे, त्यानुसार बुलढाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, नवी मुंबई, पालघर, जालना, अहमदनगर, गडचिरोली, वाशिम, ठाणे या जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संचालनालयामार्फत समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीने अहमदनगर जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी जागेची पाहणी केली व अहवालात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या १० कि.मी. परिघातील उर्वरित १३ एकर जागा मा. जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली होती. दि. २८ जुन २०२३ रोजीच्या कॅबिनेट बैठकीत वरील ९ जिल्ह्यामध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी मान्यता दिली असून अहमदनगर जिल्ह्याला जागे अभावी मान्यता मिळू शकली नाही. सदरील बैठकीत असे म्हटले आहे की, जर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जागा उपलब्ध झाल्यावर तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्यात येईल.या जिल्ह्यामधील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे व घाटी रुग्णालय, संभाजीनगर या ठिकाणी जावे लागत आहे. सदरील अंतर जास्त असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ उपचार न मिळाल्याने मृत्यु ओढवला जात आहे, तसेच नगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने कोव्हिड काळात रुग्णांचे हाल झालेले आहेत, जर जिल्ह्यात महाविद्यालय असते तर प्रशासनास बहुतांश मृत्यु रोखता आले असते.
महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा असून या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा न मिळणे ही अहमदनगर जनतेच्या दृष्टीने खेदाची बाब आहे. हा विषय रुग्णांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असल्याने प्रशासनाने गांभीर्याने या विषयांची नोंद घेऊन रुग्णहीत लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेकरिता लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री व अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खासदार यांच्याकडे केली आहे.