विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

Admin
खंडोबाचीवाडी येथे महिलांसाठी हळदी कुंकू, मंगळागौरी नृत्य स्पर्धा व होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न
भिलवडी : डिजिटल हॅलो प्रभात (शशिकांत कांबळे)
        पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे नुकतेच हळदी कुंकू, मंगळागौरी नृत्य स्पर्धा आणि होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन विशाल बाबासो शिंदे व महिला कार्यकर्त्या श्रीमती सरिता निवास माने यांनी केले होते . महिलांना घरातील कामातून थोडासा विरंगुळा मिळावा व त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच समाजात विधवा महिलांना मानाचे स्थान मिळावे त्यांनाही इतर महिला सारखे हळदी कुंकू कार्यक्रमात सन्मानाने बोलवल जावं यासाठी विधवा महिलांचे हळदी कुंकू घेऊन, त्यांना कुंकवाचा करंडा वाण म्हणून देण्यात आला. हा कार्यक्रम घेत असताना महिला खुप भावुक झाल्या होत्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सरिता माने यांनी केले होते.मी स्वतः विधवा आहे पण मी या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता.पण समाजात विधवा महिलांना महत्त्वपूर्ण स्थान दिले जात नाही. नवरा नसताना ती स्त्री स्वतः दोघांची जबाबदारी एकटी पार पाडते.मुलांना वाढवते, शिकवते पण त्याच मुलांच्या लग्नात तिला एका कोपऱ्यात बसावे लागते. हे कोठे तरी थांबले पाहिजे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
        कार्यक्रमासाठी गावातील अमोल बाळासो चेंडगे ,प्रशांत मोहन शिंदे, स्वप्नील मारूती शिंदे व विशाल सुरेश शिंदे यांनी सहकार्य केले तसेच मंगळागौर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ घार्गे मॅडम, सौ चौगुले मॅडम, श्रीमती राजश्री थोरात मॅडम, धेंडे सर परीक्षक म्हणून लाभले होते.मंगळागौर स्पर्धेत ५ ग्रुपनी भाग घेतला होता.यामध्ये स्वरगंधा ग्रुपचा प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक कलादर्पण ग्रुप व तृतीय क्रमांक जय हनुमान वाघिणी छावा ग्रुप यांचा आला. विजेत्यांना पहिले बक्षीस म्हणून विशाल शिंदे यांच्याकडून ग्रुपमधील सर्व महिलांना १० पैठणी,द्वितीय क्रमांकासाठी सचिन गुंडाजीराव सावंत यांच्याकडून १० सोन्याच्या नथी व तृतीय क्रमांकासाठी बक्षीस अधिक प्रभाकर चेंडगे यांच्याकडून १० चांदीची जोडवी देण्यात आली. 
        होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी इस्लामपूर गावच्या निवेदिका सौ तेजस्विनी शहा उपस्थित होत्या.त्यांनी त्यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाने सर्व वातावरण प्रसन्न केले.या कार्यक्रमाचा महिलांनी भरपूर आनंद घेतला. डान्स, गाणी, खेळ यामध्ये गावांतील सर्व महिला रंगून गेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता.होममिनिस्टर साठी पहिलं बक्षीस मानाची पैठणी ही संदीप लक्ष्मण पवार यांच्या कडून, द्वितीय बक्षीस सौ मनीषा शंकर चेंडगे यांच्याकडून तर तृतीय बक्षीस सौ. माधवी महादेव मगदूम यांच्या कडुन देण्यात आले. सौ रुपाली भानुदास शिंदे या होम मिनिस्टर कार्यक्रमातील मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. यावेळी सौ. अश्विनी मदने, सौ माधवी मगदूम, श्रीमती रंगूताइ शिंदे तसेच माजी सरपंच मनीषा चेंडगे यांच्या सह गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. सरिता माने यांनी उपस्थितांचे व कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या व्यक्तिंचे आभार मानले.
To Top