शाहूंचे सांस्कृतिक कागल अशी ओळख निर्माण करुया : नवोदिता घाटगे

Admin

मुरगुड : संदीप सूर्यवंशी

        कागलची राजकीय विद्यापीठ अशी ओळख निर्माण झाली आहे. कागल कलागुण संपन्न तालुका आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये महिला युवक शेतकरी शिक्षक,वारकरी,अशा सर्व घटकांच्या कलागुणांना वाव देऊन राजर्षी शाहूंचे सांस्कृतिक कागल अशी ओळख निर्माण करुया.असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले.मुरगुड येथील सर पिराजीराव गुळ सोसायटीमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. सौ.घाटगे पुढे म्हणाल्या,ऐतिहासिक वारसा लाभलेले कागल ही घाटगे घराण्याची जहागीरी. लोक कल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांचे जनक घराणे म्हणून कागलच्या घाटगे घराण्याची ओळख आहे. या घराण्याने समाजाला अनेक अमूल्य रत्ने दिलेली आहेत. 

        यामध्ये राजर्षि छत्रपती शाहू महाराज, बापूसाहेब महाराज, श्रीमंत जयसिंग घाटगे तथा बाळ महाराज, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे या महान विभूतींची नावे आवर्जून घ्यावी लागतील.कागलला जरी ऐतिहासिक परंपरा लाभलेली असली तरी, या नगरीला नावलौकिक मिळवून देण्यात अनेक मान्यवर व्यक्ती साहित्यिक, कलावंत, यांचा मोठा सहभाग आहे. या महान व्यक्तिमत्त्वाचे आदर्श, विचार आणि कला, नेहमीच तरुणपिढी पुढे ठेवावे लागतील.जेणेकरून यापुढेही कागलच्या नावलौकिकात भर पडेल. काळाच्या ओघात, जरी या व्यक्ती पडद्याआड झाल्या असल्या तरी, त्यांचे विचार आणि कला, जतन करण्याच्या दृष्टीने व नवीन पिढी समोर ठेवण्याच्या दृष्टीने राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समिती कागल या संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेल्या राजर्षि शाहू कागल लोकरंग महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे.असे आवाहनही त्यांनी केले.डोंगरी विकास समिती सदस्या विजया निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले

        यावेळी मंजुषा पाटील शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडिस, शाहूचे संचालक सचिन मगदूम, अरुण गुरव, दगडू शेणवी, डाॕ.अशोक खंडागळे, सदाशिव गोधडे, एकनाथ बरकाळे, अमर चौगुले, सुहास मोरे, सुशांत मांगोरे, प्रकाश देसाई, सदाशिव गोधडे, शशिकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत बिद्रीचे माजी उपाध्यक्ष दत्तामामा खराडे यांनी केले. आभार प्रवीण चौगुले यांनी मानले. 
To Top