'संघर्ष' च्या वतीने विविध उपक्रम संपन्न

Admin
शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात (सुभाष कदम)
        भाटशिरगांव (ता. शिराळा) येथे संघर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रांमधील उपक्रम ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
शिखरे ट्रस्ट- जयंत नेत्रालय यांच्या सहकार्याने दि. २० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये ८१ जणांची नेत्रतपासणी झाली. यावेळी मोतीबिंदू, काचबिंदूचे निदान व माफक दरात चष्मे देण्यात आले. मंडळाच्या वतीने दि. २२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभास महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. स्वस्तिक हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या सहकार्याने दि. २३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या मोफत हृदय तपासणी शिबिरामध्ये ७५ जणांची हृदय तपासणी पार पडली. यामध्ये हृदयविकाराचे निदान झालेल्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सदर हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत. संघर्ष गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दि‌‌. २४ जुलै रोजी भव्य महाप्रसाद पार पडला; तर दि. २५ जुलै रोजी जि.प. शाळा, भाटशिरगांव स्तरीय निबंध, चित्रकला तसेच संगीत खुर्ची स्पर्धा पार पडल्या. मंडळाच्या वतीने रोज सायंकाळच्या आरतीचा मान प्रातिनिधिक स्वरूपात गावातील सर्व समाजामधील जोडप्यांना देण्यात आला. दि. २७ सप्टेंबर रोजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींचा दिमाखदार विसर्जन सोहळा पार पडला. डीजेच्या काळात बऱ्याच वर्षांनी बॅन्ड सारखे पारंपारिक वाद्य व तेवढेच दर्जेदार बॅन्ड पथक असल्याने आबालवृद्धांनी मिरवणूकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
        गणेशोत्सवादरम्यान संघर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास व विविध उपक्रमांस माजी आमदार प्रभाकर घार्गे, जनता उद्योग समूहाचे प्रमुख राजेश पाटील, उदगिरी शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक उत्तम पाटील, एपीआय विक्रम पाटील, एपीआय जयसिंग पाटील, बीट अंमलदार अमर जाधव, 'सुनंदा'चे संचालक सागर पाटील, उद्योजक सागर कदम, देववाडीचे सरपंच सचिन नांगरे-पाटील, कांदेचे उपसरपंच संपत पाटील आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.
To Top