विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी विधायक हस्तक्षेपाची गरज : संजय बनसोडे

Admin
कोकरूड : डिजिटल हॅलो प्रभात (नारायण घोडे-पाटील)
अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत कोकरूड (ता.शिराळा) येथील बाबा नाईक महाविद्यालयाच्या इतिहास विभाग, विवेक वाहिनी व विवेक जागर मंचच्यावतीने 'वैज्ञानिक जाणीवा काळाची गरज' या विषयावर आज एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
        यावेळी 'वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर मांडणी करताना अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले, या आधुनिक काळात सुध्दा अनेकजण अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. शोषण, फसवणूक व लुबाडणूक करणाऱ्या श्रद्धांना विरोध करण्याचे काम गेली ३४ वर्षे सातत्याने अंधश्रद्धा निर्मुलन समिती शांततेच्या व सनदशीर मार्गाने करत आहे. हा विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी समाज परिवर्तनाचं काम जाणून घेणं आणि विधायक हस्तक्षेप करत त्याच्याशी जोडून घेणं. ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
        दुसऱ्या सत्रात भास्कर सदाकळे यांनी अंधश्रद्धा व बुवाबाजी या विषयावर मार्गदर्शन केले. अंगात येणं, भुताने झपाटणे, जादूटोणा, करणी, भानामती याबाबतीत लोकांना प्रश्न पडतात. पण लोकं त्याची उत्तरं शोधत नाहीत त्यामूळेच लोकं चमत्काराला बळी पडतात. त्याची प्रात्यक्षिकेच सदाकळे यांनी यावेळी सादर केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे व पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रा. अनिल काटे यांनी यावेळी 'दाभोळकर तुम्ही सुध्दा' ही कविता सादर केली. यावेळी प्रा. केशव टिपरसे, प्रा. विनोद राठोड, ग्रंथपाल प्रा. संजीवनी कांबळे यांच्यासह कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अग्रणी समन्वयक प्रा. आर. एस. माने यांनी तर सूत्रसंचालन विवेक वाहिनी प्रमुख प्रा. डॉ. के. आर. गावडे यांनी केले. आभार प्रा. ओमनाथ बाळसंतोष यांनी मानले.
To Top