भाजपाने आंदोलनच करायचे असेल तर बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल करावे !

Admin
भाजपाने आंदोलनच करायचे असेल 
तर बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल करावे !

मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कागदी ओबीसी आहेत, जन्माने नाहीत या खासदार राहुलजी गांधी यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्षाने जो गोंधळ घातला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा गुजरातच्या वर्तमान पत्रांमध्ये ‘उच्चजातीचा’ व्यक्ती मुख्यमंत्री झाला, अशा पानभर जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर मोदींनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र काढले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राहुलजी गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा भाजपाने राज्यात ढासळलेली कायदा सुव्यवस्था, महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार व शेतकरी प्रश्नांवर करावे, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सुनावले आहे.

यासंदर्भात पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने सवर्ण आहेत आणि पाच दशके ते सवर्णच होते, त्यांच्या जातीचा OBC मध्ये समावेश करण्यात आल्यानंतर त्यांनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र काढले. राहुलजी गांधी यांनी जे सांगितले त्याला दुजोरा देणारे जात प्रमापत्रण भाजपानेच दाखवून राहुलजी गांधींच्या विधानाला पुष्टी दिली आहे. नरेंद्र मोदींबद्दल काहीही बोलले की लगेच जात कशी येते, त्या जातीचा अपमान कसा होतो? भाजपाला जात-धर्म यापेक्षा दुसरे महत्वाचे काहीच कसे दिसत नाही? भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केले त्यावेळी या महिलांच्या जातीचा अपमान झाला नाही का? 

 

शेतकऱ्यांना नक्षलवादी, खलिस्तानी, अतिरेकी म्हटले त्यावेळी या शेतकऱ्यांच्या जातीचा अपमान झाला नाही. भाजपा नेते त्यावेळी मूग गिळून गप्प का बसले होते? आपल्या स्वार्थी राजकारणासाठी जातीचा व धर्माचा वापर करण्याचे भाजपाने बंद करावे.

Tags
To Top