नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल ; मुस्लिम लीगची भाषा बोलणारी काँग्रेस देशाला मान्यच नाही !

Admin
मुस्लिम लीगची भाषा बोलणारी काँग्रेस देशाला मान्यच नाही !
नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

चंद्रपुर : डिजिटल हॅलो प्रभात 
गेल्या पन्नास वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेसने देशासमोर केवळ समस्यांचा डोंगर उभा केला असून गेल्या दहा वर्षांत या प्रत्येक समस्येवर शाश्वत स्वरूपाचा तोडगा काढून मोदी सरकारने देशाला जगात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. मुस्लिम लीगची भाषा बोलणारी काँग्रेस देशाला मान्य नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे पहिल्या जाहीर प्रचार सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. समस्या सोडविणे हे कोणत्याही राजकीय पक्षाची जबाबदारी असते, पण काँग्रेसने मात्र समस्या निर्माण केल्या, असा आरोप करून मोदी यांनी आजच्या सभेत काँग्रेसवर टीकेची झोड उठविली.

        चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या संयुक्त प्रचारसभेतून मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग फुंकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उमेदवार सुधीर मुनगंटीवार व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या विराट ऐतिहासिक सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या गैरकारभाराची लक्तरे चंद्रपूरच्या वेशीवर टांगली. इंडी आघाडीच्या नावाने एकत्र आलेल्या पक्षांनी केवळ कट, कमिशन आणि मलई यांच्या हिशेबातून देशाला देशोधडीला लावले, असा थेट आरोप करत पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या कारभारावरही कोरडे ओढले. या स्वार्थी आघाडीने कुटुंबाचा व स्वतःचा विकास साधण्यासाठी राज्यातील विकास प्रकल्पांना खोडा घातला, तर काँग्रेसच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची सतत उपेक्षा झाली,असा आरोप त्यांनी केला. 


''सत्ता पाओ और मलई खाओ'' हेच इंडी आघाडीचे धोरण होते, त्यातूनच महाराष्ट्रातील अनेक विकास प्रकल्प त्यांनी रोखून धरले. महाविकास आघाडीने जलयुक्त शिवार योजना गुंडाळली, बळीराजा जलसंजीवनी योजनेला टाळे लावले, समृद्धी महामार्गाच्या कामात खोडा घातला, मुंबई मेट्रोचे काम रोखले, मराठवाडा वॉटरग्रीड योजना रखडविली, पंतप्रधान आवास योजनेतून गरीबांकरिता द्यावयाच्या घरांच्या योजनेत देखील अडसर निर्माण करून गरीबांना घरांपासून वंचित ठेवले. 

काँग्रेस म्हणजे ‘कडू कारले’!
आपल्या भाषणाच्या प्रारंभी महाराष्ट्रातील मराठीजनांच्या मनाला साद घालणाऱ्या पंतप्रधानांनी भाषणाच्या अखेरीस एक चपखल मराठी म्हण वापरून काँग्रेसी संस्कृतीचा शेलका समाचार घेतला. “कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच”… अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेसला शाब्दिक चिमटा काढला. प्रचंड जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट करून त्यास सहमती दर्शविली.
        स्वातंत्र्य मिळताच देश तोडण्यापासून, काश्मीरमधील दहशतवादाला काँग्रेसनेच खतपाणी घातले. प्रभू श्रीरामाचे अस्तित्व नाकारण्यापासून राम मंदिराच्या उभारणीत अडथळे आणणारी, श्रीरामाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यास विरोध करणारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यास विरोध करणारी काँग्रेसच होती. आता तर जाहीरनाम्या द्वारे विभाजनवादी भाषा बोलणारीही काँग्रेसच आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस व इंडी आघाडीवर जोरदार प्रहार केले. दहशतवादाने काश्मीर जळत होते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याविरुद्ध आवाज उठविला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत, तर नकली शिवसेना मात्र दहशतवादास खतपाणी घालणाऱ्यांच्या वळचणीस गेली आहे, अशी टीका करून मोदी यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. भाजपाच्या प्रचारासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आणि जनतेनेही, घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या मजबूत पुनरागमनासाठी प्रयत्न करावेत आणि प्रत्येक घरात मोदी यांचा नमस्कार पोहोचवावेत, असे आवाहनही अखेरीस मोदी यांनी केले.
Tags
To Top