निवडणुकीत विरोधक चारीमुंड्या चीत होतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विश्वास

Admin
ठाणे : डिजिटल हॅलो प्रभात 
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा ठाणे जिल्हा असून तो धर्मवीर आनंद दिघेंचाही जिल्हा आहे. धर्मवीरांना साजेसे काम आपल्याला करायचे आहे. बाळासाहेबांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी आहेत. त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील आणि विरोधक चारीमुंड्या चीत होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
        ठाणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निघालेल्या विराट प्रचार रॅलीला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी महायुतीचे नेते उपस्थित होते.
नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प लोकांनी केला आहे. तुमचा ठाणेकर या राज्याचा मुख्यमंत्री आहे. केवळ ठाण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात कधी नव्हे इतकी विकास कामे केली आहेत. आपले सरकार येण्यापूर्वी सणांवर बंदी होती. घरात बसून सरकार चालवता येत नाही. फेसबुक लाईव्हने सरकार चालत नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उबाठावर केली. अहंकारामुळे राज्य अधोगतीला चालले होते. याविरोधात आपण उठाव केला. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचे सरकार आपण स्थापन केले. मागील दोन वर्षात राज्यात प्रचंड काम झाले आहे. हे काम मतदारांपर्यंत पोहोचवायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले.
आजची प्रचंड गर्दी पाहता नरेश म्हस्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. नरेश म्हस्के यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत आहे. यंदाची निवडणूक ही विकासाची निवडणूक असून देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना डोळ्यासमोर पराभव दिसत असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नवी टुम काढली आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलणार असा आरोप करत आहेत. मात्र जोवर चंद्र आणि सूर्य आहेत तोवर बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Tags
To Top