मद्यधुंद चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं ; जागीच मृत्यू

Admin
मद्यधुंद चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं ; जागीच मृत्यू

पुणे : डिजिटल हॅलो प्रभात 
रविवारी रात्री पुण्यातील पौडफाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला मनसे  पदाधिकाऱ्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात झालेल्या अपघातात एका टेम्पो चालकाने श्रीकांत अमराळे आणि गीतांजली अमराळे या दाम्पत्याला चिरडले. हा टेम्पो चालक दारुच्या नशेत होता.

प्राथमिक माहितीनुसार, कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात हा अपघात घडला. टेम्पो चालक आशिष पवार हा दारुच्या नशेत करिश्मा चौकातील गाड्यांना धडक देत जात होता. त्याचा टेम्पो करिश्मा चौकातील सिग्नलजवळ आला तेव्हा त्याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे आणि त्यांची पत्नी गीतांजली अमराळे उभे होते. आशिष पवारने दारुच्या नशेत टेम्पो त्यांच्या अंगावर घातला. यामध्ये गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा प्रकार एक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला. त्यांनी आशिष पवारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहराच्या काही भागात मद्यविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार मद्यविक्री बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिला होता.
To Top