बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्यांना अटक ; 68 लाखाचा मुद्देमाल जप्त

Admin
बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्यांना 
अटक ;  68 लाखाचा मुद्देमाल जप्त

मिरज : हॅलो प्रभात
गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्या दोघा जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातील 68 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज शहराच्या हद्दीत गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारा सहा चाकी आयशर ट्रक (क्रमांक MH- 10 DT- 9294) जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर आयशर ट्रक ताब्यात घेण्यात आला. या ट्रकची झाडाझडती घेतली असता ट्रकमध्ये महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून आलेले दारूचे 651 बॉक्स मिळून आले. या विदेशी दारू व बियरची किंमत 33 लाख 41 हजार 280 रुपये असून जप्त केलेल्या आयशर ट्रकची किंमत सुमारे 35 लाख रुपये आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विदेशी दारूचा साठा व ट्रक असा एकूण 68 लाख 41 हजार 280 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला व दोघांना अटक केली आहे.


अटक केलेल्या दोन आरोपीमध्ये जमीर अकबर मकानदार वय 31 वर्षे व्यवसाय ट्रकचालक राहणार पाडळी सातारा आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार वय 27 वर्षे राहणार बालाजी नगर सातारा यांचा समावेश आहे. या दोघाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (इ) 80, 81, 83, 90 व 108 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरज निरीक्षक दीपक सुपे, निरीक्षक प्रभात सावंत, अजय लोंढे, लक्ष्मण पवार, जयसिंग खुटावळे, निरीक्षक इरफान शेख, स्वप्नील आटपाडकर, विनायक खांडेकर, पुंडलिक बिरुंगे, श्रीमती कविता कविता सुपने, श्रीमती शाहीन शेख, स्वप्नील कांबळे आदींनी कारवाईत भाग घेतला. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग सांगलीचे निरीक्षक दीपक सुपे करीत आहेत.
Tags
To Top