चोरट्याकडून वीस तोळ्याचे दागिने हस्तगत
मुद्देमालासह जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश
सांगली : हॅलो प्रभात
जामवाडी परिसरातील घरातून दहा लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. त्यांच्याकडून वीस तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. योगेश अनिल जाधव (वय ३७, कोल्हापूर रस्ता) असे संशयितांचे नाव आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जामवाडी येथील अनिरूद्ध चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या घरातून चोरट्याने दहा लाख दहा हजार रुपये किंमतीचे दागिने चोरले होते. शहर पोलिसांत फिर्याद दाखल झाली होती. दरम्यान, घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश घुगे यांनी दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक नियुक्त केले. उपनिरीक्षक महादेव पोवार व पथक गस्तीवर होते. पथकातील संदीप पाटील, संतोष गळवे व गौतम कांबळे यांना कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीजवळ योगेश जाधव हा चोरीतील दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने घटनास्थळी धाव घेत जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सोन्याच्या सहा बांगड्या मिळून आल्या. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून केली असता सूर्यवंशी यांच्या घरातून दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिस अंमलदार संदीप पाटील यांनी जाधवला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याचा गोफ, सोन्याची साखळी व बांगड्या असे दहा लाख दहा हजार रुपये किंमतीचे २० तोळे सोने जप्त केले. या कारवाईत विनयक शिंदे, रफिक मुलाणी, सतीश लिंबाळे, योगेश सटाले, गणेश कोळेकर, संदीप कुंभार, योगेश हक्के, कॅप्टन गुंडवाडे यांचा सहभाग होता.