पवार साहेबांइतके काम कोणीच केले नाही : आ.जयंत पाटील

Admin
शरद पवार यांच्याइतके काम कोणीच
केले नाही : जयंत पाटील 

सांगली : हॅलो प्रभात
देशाच्या इतिहासात कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी जितके काम केले, तितके कोणीही केले नाही. शरद पवार यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास असून, अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन वारंवार पवार यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करू नयेत, असा सल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिला.  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टीका केली होती. यावर बोलताना आ.पाटील यांनी हा सल्ला दिला. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रश्न उपस्थित करणार्‍यांनी शरद पवार यांचे काम समजून घेतले असते, तर त्यांना प्रश्नच पडला नसता. 


अमित शहा जर देशात फिरले, तर त्यांना तेथील शेतकरी सांगेल की, त्यांचा सात-बारा पवार यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मदतीने कोरा केला. इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर शेतकर्‍यांना त्यानंतर त्यांनी पॅकेज दिले. ‘एफआरपी’चे धोरण आणले आणि त्याची कडक अंमलबजावणी केली.  पवार यांनी आयात करणार्‍या देशाला निर्यात करणारा देश बनवले. पिकांना चांगला हमीभाव दिला, फळबागांना अनुदान दिले.  त्यामुळे शेतकरी आज मोठ्या प्रमाणात पिके घेत आहेत. त्यांनी कांदा, केळी अशा पिकांसाठी संशोधन केंद्र उभे केले. अशा अनेक गोष्टी मी सांगेन, पण त्याला दिवस कमी पडतील असेही आ. पाटील म्हणाले. 
Tags
To Top