![]() |
चिंचणी : हॅलो प्रभात
कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथे पाडळी रोड लगत असलेल्या तलावाशेजारील शेतात बिबट्याचे अंदाजे पाच ते सहा महिन्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ऊसतोड मजुरांना उसाचा फड दाखवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पाण्यात मृताअवस्थेत बिबट्या दिसला. मृत्यू पाण्यात पडून झाल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे या परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
याबाबत अधिक माहिती, पाडळी रोड लगत चिंचणी तलावा शेजारी पवन माने यांची जमीन आहे. यामध्ये उसाचे क्षेत्र आहे. मंगळवारी दुपारी माने ऊसतोड मजुरांना घेऊन उसाचे क्षेत्र दाखवण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेताजवळ साचलेल्या पाण्याच्या डबक्यात प्राणी मरून पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी चिंचणी येथील प्राणिमित्र महेश पाटील यांना फोनवरून माहिती दिली व बोलावून घेतले. पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तो प्राणी बिबट्याच असल्याचे खात्रीलायक समजले. त्यानंतर त्यांनी कडेगाव प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळात वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष शिरसेटवार हे कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता बिबट्याचे अंदाजे सहा ते सात महिन्याचे पिल्लू असल्याचे निदर्शनास आले. साधारणतः ही घटना आठ दिवसापूर्वी घडल्याचा अंदाज शिरसेटवार यांनी व्यक्त केला. बिबट्याचे शरीर पाण्यात पडून पूर्णपणे कुजल्याने चिंचणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी मुजावर यांनी वस्तुस्थिती पाहून शवविच्छेदन केले. पंचनामा झाल्यानंतर संध्याकाळी उशिरा बिबट्याचा मृतदेह दहन करण्यात आला.

