महिला सक्षमीकरणासाठी वार्षिक योजनेतून मदत करणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Admin
महिला सक्षमीकरणासाठी वार्षिक योजनेतून 
मदत करणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : हॅलो प्रभात
असंख्य उच्चशिक्षित महिला लग्नानंतर आपली ओळख गृहिणी अशी करुन देतात. मात्र, हीच गृहिणी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर तिची समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होते. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच आग्रही असून, आगामी काळात महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी; यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित 'मिनी सरस २०२५' प्रदर्शन व विक्री केंद्रास पालकमंत्री पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा.विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


पालकमंत्री पाटील म्हणाले, आजची महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त योगदान महिलांचे आहे. महिलांच्या सक्षमीकरणास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. गेल्या वर्षभरात अनेक उद्योजकांना भेटून महिलांच्या कौशल्यानुसार त्यांना अर्धवेळ रोजगार उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरत होतो. टाटा उद्योग समूहाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे महिलांना आपलं घर चालवण्यात हातभार लावता येईल व त्या आत्मनिर्भर होण्याची सुरवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
To Top