काँग्रेसने डॉ.आंबेडकरांचा अवमान केला
राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान यांचा हल्लाबोल
भाजपावर संविधान बदलण्याचा आरोप करणा-या काँग्रेसने अनेकवेळा घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. आणीबाणी लादून, संविधानात बदल करून संविधानाचा गळा घोटला होता असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान यांनी रविवारी केला. भारतीय जनता पार्टीवर संविधान बदलाचा बिनबुडाचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेस आणि राहुल गांधी यांना नाही अशा शब्दांत श्री. पासवान यांनी टीकेची झोड उठवली. राज्यघटनेस 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे देशव्यापी संविधान गौरव अभियान सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष शरद कांबळे, सरचिटणीस राहुल कांबळे, भटके विमुक्त आघाडी महामंत्री मनीष पतंगी, मुंबई सचिव राम शिंदे, द. मुंबई महामंत्री साक्षी दरेकर, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.
यावेळी पासवान यांनी सांगितले की, काँग्रेसने कायमच दलित विरोधी, वंचित विरोधी, समता विरोधी भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी संविधानाला राजकीय अस्त्र बनवत लोकसभा निवडणुकीपूर्वी हीन राजकारण करत फेक नरेटिव्ह तयार केले. मात्र फुले, शाहू , आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील सूज्ञ मतदारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पारड्यात भरघोस मतदान करत फेक नरेटिव्ह धुळीस मिळवले. याबद्दल श्री. पासवान यांनी महाराष्ट्राच्या मतदारांचे आभार मानले. संविधान हा भाजपासाठी आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे. यापुढे राहुल गांधींनी बाबासाहेबांचे नाव घेण्याआधी त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने केलेल्या महापापांचे स्मरण एकदा करावे आणि महाकुंभात सहभागी व्हावे असा खोचक सल्ला ही पासवान यांनी दिला.