![]() |
अंबप फाट्यावर बस पलटी ; चार प्रवासी जखमी |
पेठ वडगाव : हॅलो प्रभात
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेंगलोरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या आराम बसचा अंबप फाट्यावर चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्ता दुभाजकाला धडकून पलटी होवून अपघात झाला. अपघातात चारजण जखमी झाले असून अपघात सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत पोलीसातून घेतलेली माहिती अशी, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून बेंगलोरहून पुण्याच्या दिशेने आराम बस निघाली होती. दरम्यान अंबप (ता.हातकणंगले) येथील अंबप फाट्यावर ही आराम बस आली असता बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्ता दुभाजकाला धडकून बस पलटी झाली.
आराम बस मध्ये ३१ प्रवाशी होते. यातील प्रवाशी जगदीश पुजारी (वय४२), उषा पुजारी (वय ३३,दोघे रा. बिबेवाडी, पुणे, मूळ रा.केरळ), रतन अनशन (वय ४०, रा.लोअर परेल, मुंबई) हे तिघे व अन्य एक मुलगा हे गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी वडगाव पोलिसांनी धाव घेवून अपघातातील जखमीना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त बस क्रेनने रस्त्यातून बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातातील जखमीवर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात बसचे नुकसान झाले असून बसमधील किरकोळ जखमी व अन्य सुरक्षित राहिलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बस मधून पुणे येथे पाठविण्यात आले.
बसचा वेग कमी असल्याने जीवितहानी टळली. तीन दिवसापूर्वीच या टोप येथे आराम बसने ट्रकला पाठीमागून धडक देवून अपघातात एक ठार तर १६ प्रवाशी जखमी झाले होते. महामार्ग रुंदीकरणाचे काम धीम्या गतीने सुरु असल्याने अपघात होत आहेत. महामार्गाचे काम गतीने करण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे. अपघाताची नोंद रात्री उशिरा वडगाव पोलिसात झाली असून अधिक तपास वडगाव पोलीस करत आहेत.