माधवनगर येथील चोरीचा गुन्हा उघडकीस ; १.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Admin
माधवनगर येथील चोरीचा गुन्हा उघडकीस
आरोपी जेरबंद ; १.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सांगली : हॅलो प्रभात
माधवनगर परिसरात वयोवृद्ध महिलेकडील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाण्याच्या जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणत रेकॉर्डवरील सराईत आरोपीला जेरबंद केले आहे. याप्रकरणी दस्तगीर गुलाब शेख (वय ४४, रा. सदर बाजार, शाहू कॉलनी, कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. २७ जानेवारी रोजी सकाळी फिर्यादी यांच्या आजी माधवनगर येथून घरी जात असताना अज्ञात आरोपीने मोटारसायकलवर बसवून बँकेत पैसे काढण्यासाठी नेण्याचे आमिष दाखवले. गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगितले असता, दागिने काढताच आरोपीने ते हिसकावून पळ काढला. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
पोलीस अधीक्षक  संदीप घुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजिव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने तपास सुरू केला. दि. ३० जानेवारी २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अंकली येथील धनश्री लाकडी कलाकृती केंद्राजवळ सापळा रचण्यात आला. त्यावेळी संशयित दस्तगीर गुलाब शेख याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत त्याच्या पँटच्या खिशात सोन्याचा दागिना आढळून आला. सखोल चौकशीत त्याने माधवनगर येथील जबरी चोरीची कबुली दिली. आरोपीकडून चोरीतील सोन्याचा दागिना व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Tags
To Top