देशाचे कृषी व सहकार क्षेत्र झपाट्याने बदलत असून सहकारातून उद्योग, व्यवसाय उभे राहत आहेत. देशात सुमारे साडेआठ लाख सहकारी संस्था कार्यरत असून त्यांच्याशी ३० कोटींपेक्षा अधिक नागरिक थेट जोडलेले आहेत. सहकार क्षेत्र अधिक पारदर्शक, सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी भविष्यात किमान १७ लाख प्रशिक्षित युवकांची आवश्यकता भासणार आहे, असा दावा केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला. वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (वॅमनीकॉम) संस्थेच्या २०२३ ते २०२५ या कालावधीतील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन पदविकेच्या ३१व्या तुकडीचा पदवीदान समारंभ त्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संस्थेच्या संचालक व राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेच्या सचिव मिनू शुक्ला पाठक उपस्थित होत्या.
ते पुढे म्हणाले, कृषी व्यवसाय नव्या स्वरूपात विकसित होत असून सहकारी संस्थांचे जाळे अधिक बळकट होत आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या जगातील चौथ्या क्रमांकावर असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर जाण्याचे उद्दिष्ट आहे. हे साध्य करायचे असेल, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला भक्कम आधार देणे अत्यावश्यक आहे.
.png)

