सोशल मीडियावरील लोकप्रियता ठरली अपुरी ; रिल्स स्टार निर्मला नवले पराभूत

Admin
सोशल मीडियावरील लोकप्रियता ठरली अपुरी
 रिल्स स्टार निर्मला नवले पराभूत

शिरूर : हॅलो प्रभात
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या कारेगावच्या माजी सरपंच आणि रिल्स स्टार निर्मला नवले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी सुमारे २ हजार ७०० मतांच्या फरकाने विजय मिळवत बाजी मारली. शिरूर तालुक्यातील ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता, प्रचारसभांतील मोठी गर्दी आणि डिजिटल माध्यमांतील प्रभाव पाहता निर्मला नवले सहज विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्ष मतदानात मतदारांनी वेगळाच कौल दिला.

प्रचाराच्या काळात मनीषा पाचंगे यांनी घराघरांत जाऊन संपर्क साधला, स्थानिक प्रश्नांवर भर दिला आणि मतदारांशी थेट संवाद ठेवला. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि शांत प्रचाराचे प्रतिबिंब निकालात स्पष्टपणे दिसून आले. दुसरीकडे, निर्मला नवले यांची ओळख प्रामुख्याने सोशल मीडियापुरती मर्यादित राहिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. सभांतील गर्दी आणि ऑनलाइन प्रतिसाद असूनही प्रत्यक्ष मतदानात अपेक्षित पाठबळ मिळाले नाही.आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले यांची ‘उच्चशिक्षित सरपंच’ म्हणून ओळख निर्माण झाली होती. सोशल मीडियावर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, आलिशान गाडीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या अधिक चर्चेत आल्या होत्या.

या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे कारेगाव मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा मानला जात होता. मात्र भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. या निकालामुळे सोशल मीडियावरील लोकप्रियतेपेक्षा मतदारांशी थेट नातं आणि स्थानिक पातळीवरील काम किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा आहे. तसेच या पराभवानंतर निर्मला नवले यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
Tags
To Top