भारत अंडर-१९ विश्वविजेता ; इंग्लंडवर १०० धावांनी दणदणीत विजय

Admin

हरारे : हॅलो प्रभात न्यूज नेटवर्क 
भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करत इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. हरारे येथे पार पडलेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. या विजयाचा प्रमुख शिल्पकार अवघा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी ठरला.


वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात संथ झाली होती. मात्र त्यानंतर वैभव सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने अवघ्या ८० चेंडूत १७५ धावांची विस्फोटक खेळी साकारली. या खेळीत त्याने १५ षटकार आणि १५ चौकार लगावले. वैभवने ५५ चेंडूत शतक पूर्ण केले, तर ७१ चेंडूत १५० धावांचा टप्पा पार केला. वैभवच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ९ बाद ४११ धावांचा भव्य डोंगर उभारला. कर्णधार आयुष म्हात्रेने ५३ धावांची संयमी खेळी करत संघाला मोलाची साथ दिली.

Join Now

इंग्लंडचा प्रतिकार निष्फळ
४१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवातीला आक्रमक खेळी केली. बेन डॉकिन्सने ६६, तर बेन मायसने ४५ धावांचे योगदान दिले. मात्र भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव ढासळला. एका टप्प्यावर इंग्लंडने अवघ्या आठ चेंडूंत चार महत्त्वाचे फलंदाज गमावले आणि तेथूनच सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. कॅलेब फैलकॉनरने २६ चेंडूत अर्धशतक झळकावत काही काळ लढा दिला, मात्र इंग्लंडचा संपूर्ण डाव ३११ धावांवर आटोपला.

भारताचा अजिंक्य प्रवास
या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना न गमावता विजेतेपद पटकावले. हेनिल पटेलने स्पर्धेत सर्वाधिक ११ बळी घेतले, तर वैभव सूर्यवंशी ४३९ धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. २०२६ मधील या विजयामुळे भारताने सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवत अंडर-१९ क्रिकेटमधील आपले वर्चस्व अधिक बळकट केले.
Tags
To Top