चिकुर्डे गटातून उद्धवसेनेचा विजय ; जिल्हा परिषदेत अभिजीत पाटील यांची ‘एंट्री’

Admin
चिकुर्डे गटातून उद्धवसेनेचा विजय
जिल्हा परिषदेत अभिजीत पाटील यांची ‘एंट्री’

सांगली : हॅलो प्रभात
शिवसेनेच्या विभाजनानंतर झालेल्या पहिल्याच जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजीत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गटातून विजय मिळवत जिल्हा परिषदेत पक्षाची उपस्थिती नोंदवली आहे.


महापालिका व नगरपालिका निवडणुकांतील अपयशानंतर उद्धवसेनेला जिल्हा परिषदेत चंचूप्रवेश मिळाल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतर शिंदेसेना व उद्धवसेना या दोन्ही गटांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत उमेदवार उभे केले होते. शिंदेसेनेने सर्व तालुक्यांत उमेदवार देत संघटनात्मक ताकद दाखवून दिली होती, तर त्या तुलनेत उद्धवसेनेचे उमेदवार मर्यादित होते.

Join Now

याआधी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेचे दोन उमेदवार निवडून आले होते, तर उद्धवसेनेला यश मिळाले नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे शिंदेसेनेने आटपाडी व खानापूर तालुक्यांत जोरदार कामगिरी करत आपली ताकद दाखवली. दरम्यान, वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गटात उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजीत पाटील यांनी विजय मिळवत पक्षासाठी महत्त्वपूर्ण यश संपादन केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या सहकार्याने हा विजय साध्य झाल्याची चर्चा आहे.
To Top