सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
येथील सांगली-मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डसमोरील चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत सायकलस्वार ठार झाले. श्रीकिशन ठाकूर (वय ४५, देवरीया, उत्तरप्रदेश) असे त्याचे मृताचे नाव आहे. रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, संबंधित ट्रक चालकास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की श्रीकिशन ठाकूर हे मूळचे उत्तरप्रदेशमधील आहे. सांगलीत ते सुतार काम मजूर म्हणून काम करत होते. येथील चांदणी चौकात ते एका भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. आज रात्री नऊच्या सुमारास ते भाजीपाला खरेदी करून चांदणी चौकाकडे निघाले होते. त्यावेळी सांगलीहुन मिरजेच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला ट्रकने (एमएच १० एमव्ही ८१७२) जोराची धडक दिली. ठाकूर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, वर्दळीच्या ठिकाणी अपघात झाल्याने परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली. काही नागरीकांनी तत्काळ विश्रामबाग पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेला. रात्री उशीरा मृताची ओळख पटवण्यात आली. सहायक निरीक्षक पल्लवी यादव, उपनिरीक्षक अकबर हवालदार, अंमलदार एस. एस. माने, विशाल भिसे, पोपट नागरगोजे, होमगार्ड हेमंत कोळी यांनी पंचनामा केला. भर चौकात ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत होती.