रासपा स्वबळावर निवडणूक लढवून आपली ताकद दाखवणार : आ. महादेव जानकर

Admin

 

पनवेल मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष कोकण पदाधिकारी मेळावा उत्साहात

पनवेल  : डिजिटल हॅलो प्रभात (हेमंत धायगुडे)
    आमची लढाई ही स्वराज्यासाठी आहे. मला भाजपची सत्ता नको, काँग्रेसची सत्ता नको, मला रासपची सत्ता पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केले. पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात राष्ट्रीय समाज पक्ष कोकण पदाधिकारी मेळाव्यात आ. जानकर बोलत होते. मंचावर भूतपूर्व रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य सचिव जिवाजी लेंगरे, राज्य कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब वाघ, भगवान ढेबे, रायगड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषाताई ठाकूर आदी उपस्थित होते.

    आ.जानकर पुढे म्हणाले, भाजप मुख्यमंत्री करेल त्याचा काही उपयोग होणार नाही. मुख्यमंत्री करेल आणि माईक ओढून घेईल. आम्हाला कुणाचे बाहुले बनायचे नाही, आम्हाला मालक बनायचे आहे. आमची झोपडी असेल, नसेल आमचा महाल, आमची स्वाभिमानाची झोपडी आहे. तुमचे १०७ असतील, त्यांचे ५० ह्यांचे ४०, त्यांचे २८ आहेत, आमचे दोनच आहेत, पण दोनचे दोनशे करायला वेळ लागणार नाही. लोकांकडून मी पैसा घेतो, पैसे दिले तर लोक मत देतात आणि प्रेम करतात. सुदाम जरग या कार्यकर्त्याने आजवर पक्षाला २५ ते ३० लाख रुपये दिले. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या चौकात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढवली पाहिजे. २७ वर्षाचा अग्निकुंड केल्यानंतर ४ राज्यात पक्ष पोहचवला.  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड जिल्ह्यात गावागावात पक्षाध्यक्ष नात्याने पोहोचलोय, पण आपला पदाधिकारी कार्यकर्ता लोकांपर्यंत पोहोचत नाही. कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी व्हाट्सअप किंग होऊ नये. डिजिटल वर फोटो लावला म्हणजे नेता होत नाही, अशा शब्दात कार्यकर्त्यांचे महादेव जानकर यांनी कान टोचले. सर्व धर्माला, सर्व समाजाला सोबत घेऊन कोकणात पक्षाचे संघटन वाढवलं पाहिजे. पक्षात सर्वांना संधी दिली जावी. विभागावर मेळावा झाले आता जिल्हावर मेळावा घेण्याचे निर्देश श्री.जानकर यांनी दिले.
आ. जानकर पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडून पक्षाला कार्यालय मिळालं. पक्षाला मान्यता असल्याशिवाय कार्यालय मिळत नाही, जे आजवर उमेदवार लढले, त्यांच्या मताच्या बळावरच हे कार्यालय मिळाले. लवकरच उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील पक्षाला कार्यालय मिळेल.  दिल्लीत कार्यालय मिळवण्यासाठी सहा राज्यात पक्षाला मतदान वाढवावे लागेल. चार राज्यात मते मिळाले आहेत, यापुढे दोन राज्यात तयारी करावी लागेल. आजपर्यंत आपण भाजपबरोबर युतीत असल्यामुळे जरा अडचण झालेली. सगळीकडे आपणाला उमेदवार देता आले नव्हते. कार्यकर्त्यांनी आता हिंमतीने निवडणुका लढवाव्यात. पक्षाचे संघटनात्मक काम वाढले पाहिजे. ज्या दिवशी ९० हजार पोलिंग बूथ अध्यक्षांचा मेळावा होईल, त्यादिवशी पक्ष यशस्वी होईल. लोकवर्गणीतून पक्षाला पैसाही गोळा करावा लागेल. हे फार मोठे पक्ष नाहीत, हवा केली जाते. आम्ही सोबत असो, तर सत्तेत येतील. आम्ही सोबत नसेल तरी सत्तेत येणार नाहीत. कोकणात महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचे खाते उघडलं पाहिजे.  रासपचे १५ आमदार येऊ द्या, रासपला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही. कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून, काम केलं पाहिजे. एकेकाळी शेकापचे फार मोठे अधिराज्य होते, आज शेकाप कुठेही नाही. आता भाजपचेही तसेच चालले आहे.  मी २७ वर्षात समाज राजकारणात आहे बरेच पक्ष मोठे झाले. वर गेले आणि खाली आले, मला चांगलं माहित आहे. २० वर्षांपूर्वी आम्ही म्हणायचो, पंतप्रधान होऊ. आमच्यातलेच लोक म्हणायचे, यांचा सरपंच नाही आणि काहीतरी सांगतात.  चार आमदार, एक मंत्री, एक राज्यमंत्री आणि शंभरच्यावर नगरसेवकांना रासपने जन्म दिलेला आहे.
यावेळी मेळाव्यात महादेव जानकर यांना दोन लाख रुपये नोटांचा हार घालण्यात आला. कोकण प्रदेशातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. राजेंद्र खाडे, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष शरद दडस, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष संपतराव ढेबे, तुषार खरिवले, संजय घाडगे, ठाणे जिल्हाध्यक्ष रुपेश थोरात, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष एड. किशोर वरक, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत, श्रीकांतदादा भोईर, आण्णासाहेब वावरे, जगत घरत, देवानंद मोटे, आदी उपस्थित होते.



To Top