औदुंबरफाटा येथे भीषण अपघात ; ४ महिला जखमी

Admin

 

हलगर्जीपणे वाहन चालवले : गाडी चालकावर गुन्हा दाखलभिलवडी : डिजिटल हॅलो प्रभात (शशिकांत कांबळे) 

भिलवडी आष्टा मार्गावर पलूस तालुक्यातील औदुंबर फाट्याजवळ दोन चार चाकी गाडींची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये चार महिला जखमी झाल्या असून, दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.भिलवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अकलूजहून कोल्हापूर कडे भिलवडी आष्टा मार्गावरून पाहुण्यांच्याकडे जात असलेली, इरटिगा गाडी क्रमांक एम एच ४५ ए क्यू ९२९२ हि भिलवडी  औदुंबर फाटा येथून जात असताना, आष्ट्याकडून अंकलखोप मार्गे औदुंबरकडे येणारी वॅगनार गाडी क्रमांक एम एच ९ बी एक्स ३९४८ हि चार चाकी गाडी मुख्य रस्ता पार करून, औदुंबरकडे जात असताना भिलवडीकडून आलेल्या इरटिगा गाडीची जोरदार धडक वॅगनार गाडीला बसल्याने मोठा अपघात झाला.हा अपघात इतका भयंकर होता की, वॅगनार गाडी फरफटत जाऊन, रस्त्यावर उलटी झाली तर इरटिगा गाडी रस्त्याच्या उजवीकडे शेतात जाऊन विद्युत वाहक खांबाच्या ओढण तारेला जावून धडकली.


यामध्ये  ज्योती सुनील वायकर (वय वर्षे ३५), अलका बबन रेणके (वय वर्षे ४५), वत्सला महादेव रेणके (वय वर्षे ४२) सर्व राहणार अकलूज  (माळीनगर)  तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या इरटिगा गाडीतील ३ महिलांसह वॅगनार गाडी मधील प्रतिभा प्रणव माळी (वय वर्ष २७) राहणार इचलकरंजी हि एक महिला अशा एकूण ४ महिला  जखमी झाल्या आहेत.घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या सह भिलवडी पोलीस  घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.सदर घटनेची भिलवडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून,हलगर्जीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरले प्रकरणी वॅगनार गाडी चालकावर भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार प्रविण सुतार हे करीत आहेत.
To Top