वन विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर !

Admin
अधिकारी व लाकूडतोडे यांच्यातील दिलजमाई  : चोरून तोडलेली झाडे उघड 
     गगनबावडा : डिजिटल हॅलो प्रभात (किरण मस्कर) 
कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर लोंघे ते गगनबावडा दरम्यान बेकायदेशीर वृक्षतोड झाली असतांना वन विभागाने मात्र एकही झाड तोडलेले नसल्याचा पंचनामा केल्याने अधिकारी व लाकूडतोडे यांच्यातील दिलजमाई दिसून येत आहे. 'गगनबावडा तालुक्यात बेकायदा वृक्षतोड ' राजरोस व दिवसाढवळ्या सुरू असून काही ठिकाणी चोरून तोडलेली झाडे उघड केल्याने वनविभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. जैवविविधतेने नटलेला गगनबावडा तालुक्यातील वृक्षांना प्रशासनातील अधिकारी व बेकायदेशीर लाकूड व्यावसायिकांची दृष्ट लागली आहे. कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर लोंघे ते गगनबावडा दरम्यान वाहतूक अडवून दिवसाढवळ्या मोठया प्रमाणावर  बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे. 
अधिकारी व कर्मचारी यांच्या कृपाआशीर्वादाने अवैध वृक्षतोड होत असल्याच्या आरोप नागरिक व वाहनचालक यांच्यातून होत होता. वृक्षतोड झाल्यानंतर त्या गाडीला वनक्षेत्राच्या हद्दीमधून किंवा रस्त्यावरून बाहेर कसे पडता येते हेच कोडे सामान्य लोकांना पडले आहे. रस्त्याशेजारी तोडलेल्या झाडांचा खच जागोजागी आढळून येत आहे. साळवण-निवडेच्या भर बाजारपेठेसह अन्य ठिकाणी लाकडांचा डेपो आहेत. जवळच साळवण येथे वनपरिक्षेत्र अधिकारी व महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कार्यालय आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांचेही वारंवार पाहणी दौरे असतात. वृक्षतोड परवानगीबाबत शासकीय यंत्रणा म्हणून वनविभाग आणि महसूल विभागाची भूमिका महत्वाची आहे.तरीही कुणीच आक्षेप घेत नाही, हेच आश्चर्य आहे. धोकादायक वठलेले वृक्ष काढणे आवश्यक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात वनविभागाला सूचित केले होते. वृक्षतोडीबाबत कोणी विचारणा केली तर हे पत्र दाखवून आपल्याला ठेका मिळाला असल्याची दिशाभूल हे लाकूडतोडे करतात. 
ज्या घरासमोर किंवा दुकानासमोरील झाड काढायचे आहे. त्यांच्याकडूनही कांही रक्कम घेतली जाते.  तोडलेल्या झाडांचे उघडे बुंधे पालापाचोळा, काटेरी कुंपणाच्या शिरट्यांनी तसेच कांही ठिकाणी मुरूम, मातीची ट्रॉली टाकून, काही ठिकाणी विटेचे बांधकाम करून बुंधे मुजवले आहेत. सदरची तुटलेली झाडे गगनबावडा तालुक्यातील नसून कळे ते कोल्हापूर मार्गावर रुंदीकरणासाठी तोडली असल्याचा कांगावा मात्र वनविभागाने केला आहे. 
याबाबत संबंधित वन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली पण वन अधिकारी यांच्याकडून या परिसरातील कोणतेही झाड तोडले नसल्याचा निर्वाळा करण्यात आला आहे. पण ज्यावेळी आम्ही स्वतः चौकशी केली त्यावेळी अनेक झाडे कापून नेले आहेत व त्या ठिकाणी तोडलेले झाड दिसू नये यासाठी कचऱ्याचा, मातीचा, विटांचा ढीग टाकण्यात आला आहे. सदरचा प्रकार वनविभागाच्या बाबतीत निंदनीय असून याची चौकशी होणे गरजेचे आहे.
जी.एस.कांबळे (समन्वयक)
मानवाधिकार संघटना महाराष्ट्र राज्य


 

To Top