सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी जेरबंद : ३ लाख ७० हजाराच्या मुद्देमालासह तिघांना अटक

Admin

 

निगडीतील खूनाचा उलगडा : पुरावा नसताना दरोड्याचा छडा 

सांगली :  डिजिटल हॅलो प्रभात 

शिराळा तालुक्यातील निगडी डोंगरी भागातील  दरोडा टाकून घरातील महिलेच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढताना  हत्याराने डोक्यात मारहाण करीत तिच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या फरार टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. हा गुन्हा पाच जणांच्या टोळीने केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून  चोरलेले ३ लाख ७० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

         अटक करण्यात आलेल्यांमध्ये  मगऱ्या अशोक ऊर्फ अजीतबाबा काळे (वय १९ रा, येवलेवाडी ता वाळवा), तक्षद ऊर्फ स्वप्नील पप्या काळे (२६ रा.कार्ये ता. वाळवा ) आणि गोपी ऊर्फ टावटाव त्रिशुल ऊर्फ तिरश्या काळे (१९ रा. ऐतवडे खु. ता. वाळया) यांचा समावेश आहे. दरम्यान दरोड्याच्या घटनेत सदाशिव दादू साळुंखे आणि हिराबाई सदाशिव साळुंखे हे वृध्द दांपत्य गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना हिराबाई साळुंखे यांचा मृत्यू झाला होता.
       निगडी गावचे शिवारात वस्तीवर सदाशिव दादु सांळुखे व हिराबाई सदाशिव साळुंखे हे वयोवृद्ध दांपत्य राहत होते. त्यांच्या घरावर मागील महिन्यात दि. १७ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरामध्ये असलेल्या झोपेत हिराबाई साळुंखे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला दोघांनी विरोध केल्याने हल्लेखोरांनी सदाशिव व हिराबाई यांना कोणत्यातरी हत्याराने डोक्यात गंभीर मारहाण केली. आणि काही वेळात ते तेथून पसार झाले. दरम्यान जखमी हिराबाई यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस पथके जिल्ह्यासह अन्यत्रही पाठविण्यात आली होती. इस्लामपूर परिसरात गस्तीवर असणाऱ्या पोलीस पथकास हा दरोडा मगऱ्या काळे आणि त्याच्या टोळीने घातला असल्याची माहिती मिळाली. तसेच सध्या मगऱ्या हा लक्ष्मी फाटा, इस्लामपूर रस्ता परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी सापळा रचला. काही वेळाने तेथे तिघे युवक संशयास्पद हालचाली करताना आढळल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच एक दुचाकी असा मुद्देमाल मिळाला. याबाबत संशयीतांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी निगडी येथील एका घरात मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकून दांपत्यास मारहाण करुन मुद्देमाल लुटल्याची कबुली दिली. हा दरोडा पाच जणांनी मिळून टाकला असून यामधील दोघे अद्यापी फरारी आहेत. त्यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली असून या गुन्ह्याची नोंद शिराळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, शिराळा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक सुरेश चिल्लावार, स.पो.नि. संदीप शिंदे, सुनील चौधरी, उद्यसिंह माळी, बिरोबा नरळे, संदिप गुरव,संकेत कानडे, सागर टिंगरे, शुभांगी मुळीक, प्रकाश पाटील, अंकुश ढवळे आदींसह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.


Tags
To Top